भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेत काही मुद्द्यांवर बोलत होते. त्याचवेळी विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘चला आवरतं घ्या. एक-दोन मिनिटांत आवरतं घ्या. तुमची 13 मिनिटं झाली आहेत.’ त्यावर पडळकर म्हणाले, माझे विषय महत्त्वपूर्ण आहेत. तुम्ही पहिल्या लोकांना इतकं बोलायला देता की, पुढचं सगळं गणित बिघडवून टाकता.’ मग नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, ‘तुमचं गणित बिघडलं आहे, ते थांबवा आता.’
नीलम गोऱ्हेंनी पडळकरांना थांबवल्यानंतर काय झालं?
मग आमदार गोपीचंद पडळकरांनी जत तालुक्यातील दुष्काळी गावांबद्दल बोलण्यास सुरूवात केली. त्याचवेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, ‘धस साहेब, त्यांना किती वेळ बोलायला द्यायचं? किती अर्धा तास बोलू देऊ का? दोन मिनिटं… मग मी सांगितलं ना.’
उपसभापतींनी दोन मिनिटं म्हटल्यानंतर गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘नाही, नाही… दोन नाही. माझे दोन-चार विषय आहेत. मी अजून विषयही मांडले नाहीत.’ मग नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, ‘आता साडेआठ झाले आहेत. तुम्ही सगळ्या सभागृहाला वेठीस धरू नका.’
मग गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘मी कुणाला वेठीस धरत नाही. तुम्ही नियोजन नीट करत नाही. तुम्ही उगा वाद घालता.’ नीलम गोऱ्हेंनी त्यांना थांबवत विचारलं की, ‘तुम्हाला बोलायला काही मर्यादा नावाची काही गोष्ट आहे का?’
पडळकर म्हणाले, ‘नाही. नाही. मर्यादा… कशाची मर्यादा आहे. तुमचं नियोजन नीट ठेवा ना. तुम्ही एकाला एक-एक, दीड-दीड तास देता. एकाला 25 मिनिटं. आम्ही बोलायला लागल्यावर उगा बेल वाजवत बसता.’
गोपीचंद पडळकरांच्या या विधानानंतर नीलम गोऱ्हे संतापल्या. त्या म्हणाल्या, ‘आम्ही काही नियोजन ठेवलं नाही, हा विषय नाहीये. चला यांचा माईक बंद करा.’ उपसभापती असं म्हटल्यावर गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘मी तुमचा निषेध करतो.’ ‘चला. ठिक आहे’, असं गोऱ्हे त्यावर म्हणाल्या.
नीलम गोऱ्हे-पडळकरांमध्ये जोरदार खडाजंगी
पुढे बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘असं तुम्ही करू शकत नाही. यावरून तुम्हाला बऱ्याचदा ताकीद मिळालेली आहे.’ पडळकर म्हणाले, ‘काय ताकीद देताय तुम्ही.’
उपसभापती गोऱ्हे म्हणाल्या, ‘काय ताकीद देतो म्हणजे… काहीही करू शकतो आम्ही. तुम्ही इथे धमक्या देऊ नका. काय चाललंय इथे? ही कुठली पद्धत झाली. गोपीचंद पडळकर, तुम्ही अत्यंत चुकीचं वर्तन केलेलं आहे. वेळेचं नियोजन करणं माझं काम आहे. साडेआठ वाजलेले आहे. तुम्ही अशावेळी इतरांची तुलना करता.’
नीलम गोऱ्हेंनी गोपीचंद पडळकरांना सुनावली शिक्षा
या सगळ्या प्रकारानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे उभ्या राहिल्या. त्यानंतर त्या म्हणाल्या, ‘मला असं वाटतं की तुम्ही माझा निषेध केलेला आहे. ते मी सभागृहातील कामकाजातून काढून टाकते. तुम्ही, आज जे सभागृहात वर्तन केलं आहे, त्याच्याबद्दल मी उद्या दिवसभर बोलायला देणार नाही. हा माझा निर्णय आहे. तो तुम्हाला मान्य करावा लागेल. तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही बोला. तुम्ही या पीठासनाचा अपमान केलेला आहे. तो फक्त माझा अपमान नाहीये. सभागृहाचा अपमान आहे. त्याची तुम्हाला जाणीव नाहीये. त्यामुळे तुम्हाला आता बोलायला मिळणार नाही. नाहीतर मार्शलला बोलून बाहेर काढावं लागेल.