भोसरी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे ‘राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी’ अशा घोषणा देत मते मागितली जात आहेत. मात्र प्रभू श्रीराम, व हिंदू देवदैवतांची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला राम कृष्णाचे नाव घेण्याचाही अधिकार नाही असा टोला माजी महापौर व आमदार महेशदादा लांडगे यांचे कट्टर समर्थक राहुल जाधव यांनी हाणला आहे.
भोसरीतील प्रचार रंगात आला आहे. महाविकास आघाडी च्या वतीने या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाला जागा सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या वतीने रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असे म्हणत मते मागितली जात आहेत. माजी महापौर राहुल जाधव यांनी यावर टीकास्त्र सोडले आहे. याबाबत जाधव यांनी म्हटले आहे की ,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांनी श्री राम प्रभूंची बदनामी केली. राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता आपण इतिहास लक्षात ठेवत नाही. वाचत नाही राजकारणात वाहून जातो .राम हा बहुजनांचा आहे 14 वर्षे त्याने वनवास भोगला होता. मग तो शाकाहारी कसा ? असा प्रश्न आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील शिबिरात केला होता. हे विसरता येणार नाही. या उलट भारतीय जनता पक्ष व भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी कायम हिंदू हितरक्षणाची व प्रभू श्री रामाच्या चरणी लीन होण्याची भूमिका घेतली. अयोध्येत श्रीराम मंदिराची स्थापना होत असताना आमदार महेशदादा लांडगे यांनी कार सेवकांसह भोसरी मतदारसंघात काढलेली दिमाखदार रथयात्रा, संतांचे विचार समाजापुढे यावेत यासाठी चिखलीत आमदार महेशदादा यांनी पाठपुरावा करून चिखली टाळगाव येथे साकारलेले श्री संत विद्यापीठ , गोरक्षणासाठी त्यांची चाललेली धडपड हे सारे लक्षात घेता आमदार महेशदादा लांडगे हेच रामकृष्ण हरीचे खरे भक्त, हिंदुत्व रक्षक आहेत.
देव, देश आणि धर्मा पायी प्राण हाती घेतलेल्या महेशदादा लांडगे यांना आशीर्वाद देऊन त्यांच्या पाठीशी जनतेने पुन्हा एकदा आपली ताकद उभी करावी असे आवाहन माजी महापौर राहुल जाधव यांनी केले आहे.