पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नदी सुधार प्रकल्प हाती घेण्यात आला. या कामामुळे हजारो झाडांची कत्तल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्ती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही या विरोधात आंदोलन केले. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कार्यालयाबाहेरील झाडावर बसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी भाजपा आणि महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, शहरातील विकास कामांना आमचा विरोध नाही, पण विकास कामे करीत असताना पर्यावरणाचादेखील भाजपा आणि महापालिका प्रशासनाने विचार केला पाहिजे होता. मात्र तो त्यांनी केला नसल्याने आता नदीपात्र सुधार प्रकल्पअंतर्गत हजारो झाडांची कत्तल होणार आहे. नियमानुसार आम्ही झाडे लावणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आजवर महापालिका प्रशासनामार्फत झाडे काढल्यानंतर कोणत्याही ठिकाणी झाडे लावण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या नदीपात्रातील झाडांचेदेखील तेच होईल.यामुळे झाडांची कत्तल झाल्यास आम्ही न्यायालयात धाव घेऊ, असा इशारादेखील त्यांनी दिला.