पश्चिम घाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये नुकत्याच आढळलेल्या वनपस्पतीच्या नव्या प्रजातीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव देण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात डॉ. विनोद शिंपले व डॉ. प्रमोद लावंड यांना कोल्हापूर जिल्ह्यात फुलांच्या नव्या प्रजाती आढळून आल्या आहेत. यापैकी एकाचं नाव संशोधकांनी ‘अजेंरिया शरदचंद्रजी’ असं ठेवलं आहे.
शरद पवार यांनी केंद्रीय कृषीमंत्री म्हणून देशासाठी दिलेल्या योगदानाची दखल म्हणून, या प्रजातीला ‘अजेंरिया शरदचंद्रजी’ असे नाव देण्यात आले आहे, असे संशोधकांनी सांगितले आहे.
कोल्हापूर जिल्हा प्रसिद्ध पश्चिमी घाट क्षेत्रात येतो, जो की आपल्या समृद्ध जैव विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. हे दोन्ही संशोधक कोल्हापुरमधील एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषय शिकवतात. त्यांचा शोधप्रबंध ‘अजेंरिया शरदचंद्रजी’ हा अशातच जर्नल ऑफ इंडियन असोशिएशन फॉर एंजियोस्पर्म टॅक्सोनोमीमध्ये प्रकाशित झाला आहे.
डॉ. विनोद शिंपले यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, भारतात अजेंरिया प्रजातीच्या जवळपास ४० उपप्रजाती आढळतात. ही प्रजाती केवळ आशियाई देशात आढळते व त्यातील १७ उपप्रजाती भारताच्या स्थानिक आहेत आणि आता आम्ही रामलिंग डोंगररांगांमध्ये १८ व्या उपप्रजातीचा शोध लावला आहे. या रोपट्यावर जुलै ते सप्टेंबर दरम्यान फुल येत आणि फळाचा कालावधी डिसेंबरपर्यंत असतो.

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणाल्या, “ सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आढळणाऱ्या एका वनस्पतीचा शोध डॉ. विनोद शिंपले व डॉ. प्रमोद लावंड यांनी लावला असून त्याला आदरणीय शरद पवार साहेबांचे नाव दिले आहे. आता ही वनस्पती ‘अजेंरिया शरदचंद्रजी’ या नावाने ओळखली जाईल.या दोन्ही संशोधकांचे मी मनापासून आभार मानते.”