मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पित्तनलिकेतील खडे हे त्यांच्या पोटदुखीचं कारण असल्याचं तपासणीनंतर समोर आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. आता प्रकृतीत सुधारणा झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. डिस्चार्जनंतर ते मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी पोहोचले आहेत.
‘ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमनं आज शरद पवारांच्या प्रकृतीची तपासणी केली. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना सात दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील १५ दिवसांनंतर पुन्हा एकदा त्यांची तपासणी केली जाईल. त्याची प्रकृती उत्तम असल्यास त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाईल,’ अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
‘पवार साहेबांना बरे होण्यासाठी पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असल्यानं त्यांच्या भेटीस जाण्याचं टाळावं, असं आवाहन नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांना, कार्यकर्त्यांना आणि सर्व हितचिंतकांना केलं आहे.