ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाल्यानंतर देहूगाव नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक झाली. देहूगाव नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून राष्ट्रवादीचे १४ अपक्ष २ आणि भाजपचे १ उमेदवार विजयी झाले आहेत. पहिल्या नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली. परंतु शिवसेना, काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. त्याची मतमोजणी आज पार पडली. राज्यातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती. मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांची जादू चालली आहे. राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता आली राष्ट्रवादी काँग्रेसचे १४ उमेदवार विजयी झाले. तर, दोन अपक्षांनीही बाजी मारली. भाजपचा एक उमेदवार विजयी झाला आहे.