Friday, June 13, 2025
Homeताजी बातमीपुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच वर्चस्व कायम; अजित पवारांचा करिष्मा दिसला…!

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच वर्चस्व कायम; अजित पवारांचा करिष्मा दिसला…!

जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित पॅनेलने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर झेंडा फडकाविला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसचाच दबदबा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच राज्यातील सत्तापालटानंतर पुण्याच्या पालकमंत्री नियुक्त झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत स्वत: प्रचार केला होता. मात्र, भाजपप्रणित पॅनेलला मर्यादित यश मिळाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अजितदादांचा करिष्मा चंद्रकांतदादांवर भारी पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे जिल्ह्यात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील या दोन दादांमध्येच प्रामुख्याने लढत होती. यात राष्ट्रवादीने ९२ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्याचा पक्षाकडून दावा करण्यात आला आहे. तसेच माजी आंबेगावात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खेडमध्ये दिलीप मोहिते, इंदापूरात माजी राज्यमंत्री दत्ता भरणे, मावळात सुनील शेळके, जुन्नरमध्ये अतुल बेनके यांनी आपापल्या तालुक्यांत ताकद कायम राखली असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाजपची ताकद मर्यादित आहे. त्यामुळे पालकमंत्री पाटलांनी अनेक ठिकाणी स्वतः प्रचार केला. तरीदेखील भाजपला ३८ ठिकाणी विजय मिळाल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने १२ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला, तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला तीन ग्रामपंचायतींमध्ये विजय संपादन केल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. तसेच भोरमध्ये काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी भोर आणि वेल्हा तालुक्यात अपेक्षेनुसार गड राखलेला आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या मुख्य लढती

वेल्हा – काँग्रेस, राष्ट्रवादी

भोर – काँग्रेस, राष्ट्रवादी

दौंड – भाजप, राष्ट्रवादी

बारामती – राष्ट्रवादी (गट-तट)

इंदापूर- भाजप, राष्ट्रवादी

जुन्नर- राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजप

आंबेगाव – राष्ट्रवादी, बाळासाहेबांची शिवसेना

खेड -राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजप

शिरूर – राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट, शिंदे गट)

मावळ – राष्ट्रवादी, भाजप

मुळशी – काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना

हवेली – राष्ट्रवादी, भाजप

जिल्ह्यात नव्याने स्थापित आणि मुदत संपणाऱ्या २२१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यातील बिनविरोध आणि अपेक्षित अर्ज न आल्याने प्रत्यक्षात १७६ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. या निवडणुकीमध्ये सरपंच पदाची निवड थेट जनतेमधून होणार होती. मात्र, जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी कोणीही अर्ज न भरल्याने हे पद रिक्त राहिले आहे, तर ग्रामपंचायत सदस्य पदाच्या ७९ जागा रिक्त राहिल्या आहेत. या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाकडून जाहीर होईल. त्यानंतरच या जागांसाठी निवडणुक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ग्रामपंचायत निकालाची अधिसूचना शुक्रवारी (२३ डिसेंबर) तहसीलदार प्रसिद्ध करणार आहेत, असे जिल्हा ग्रामपंचायत शाखेकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments