राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना करोनाची लागण झाली आहे. पवार यांनी ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी घेण्याचं आणि चाचणी करून घेण्याचं आवाहनही केलं आहे.
आपल्या ट्वीटमध्ये शरद पवार म्हणतात, माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी.मागील काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत करोना परिस्थिती हाताळण्यासाठी शरद पवार मैदानात उतरताना दिसले होते. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य सचिवांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.
यावेळी शरद पवार यांनी करोना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर बराच काळापासूनच सुरु असलेल्या एसटी संपावर तोडगा काढण्यासाठीही शरद पवार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना सोबत घेऊन एसटी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. याशिवाय, शरद पवार राज्यातील करोना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने फोनवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कातही होते.