कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने केलेल्या लॉकडाऊन नियमांमुळे यंदा मुंबईतील आयपीएल सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण या निर्बंधानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आयपीएल सामने मुंबईतच खेळवणार असल्याचे स्पष्ट केले. यातच महाराष्ट्र सरकारनेही आयपीएलला परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सरकारने शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाऊन आणि इतर दिवशी कडक निर्बंध जाहीर केले आहेत.
मुंबई आयपीएलचे 10 सामन्यांचे आयोजन करणार आहे. त्यातील काही सामने शनिवार व रविवारी होणार आहेत. मुंबईतील पहिला सामना 10 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे.
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी आयपीएलचे सामने योजनेनुसार होतील असे सांगितले आहे. नवाब मलिक एएनआयला म्हणाले, “निर्बंधासह सामन्यांना परवानगी देण्यात आली आहे. लोकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. जे आयपीएलमध्ये भाग घेत आहेत, त्यांना आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. याच आधारावर आम्ही परवानगी दिली आहे.”
बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांनी सांगितले की, ”आम्हाला सरकारच्या वतीने सामना आयोजित करण्याची सर्व परवानगी मिळाली आहे. 10 ते 25 एप्रिल दरम्यान मुंबईत फक्त 10 सामने होणार आहेत. बायो बबलमध्ये कोणतीही समस्या नाही. आमच्याकडे एक अतिशय सुरक्षित सेटअप आहे, जिथे खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत. चार संघ आपले सलामीचे सामने मुंबईत खेळणार आहेत. त्यात चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आहेत.”