प्रभाग क्रमांक ११ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी राजकीयदृष्ट्या निर्णायक पाऊल टाकत आमदार समर्थक व सामाजिक कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांचा जाहीर पक्षप्रवेश करून घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशासोबतच अनुसूचित जाती प्रवर्गातून मारुती जाधव यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. या घडामोडीमुळे प्रभागातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याचे चित्र आहे.
फुलेनगर, घरकुल व शरदनगर परिसरात मोठा मित्रपरिवार, मजबूत जनसंपर्क आणि निस्वार्थ सामाजिक सेवेमुळे निर्माण झालेली विश्वासार्ह ओळख हे मारुती जाधव यांचे प्रमुख बलस्थान आहे. घरकुलमधील स्थानिक उमेदवार असल्याने प्रभागातील नागरिकांचा पहिला विश्वास त्यांच्यावरच बसेल, असा विश्वास राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
मारुती जाधव हे कोणत्याही राजकीय घराण्यातून आलेले नसून सामान्य व कष्टकरी कुटुंबात वाढलेले कार्यकर्ते आहेत. त्यांच्या आईने धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत मुलांचे शिक्षण पूर्ण केले. अशा प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत त्यांनी ॲम्बुलन्स चालक म्हणून काम करत अपघात, आजार व आपत्कालीन प्रसंगी असंख्य गरजू नागरिकांना वेळेवर मदत केली आहे.
“फोन आला की धावून जाणारा कार्यकर्ता” अशी ओळख संपूर्ण प्रभागात निर्माण करणाऱ्या मारुती जाधव यांनी जात, धर्म किंवा पक्ष न पाहता मदतीचा हात दिला. त्यामुळे त्यांना सर्व स्तरांतून मान्यता मिळाली आहे. आगामी निवडणुकीत चिखलीतून आलेल्या आयात उमेदवारांविरोधात स्थानिक, गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार अशी थेट व तुल्यबळ लढत प्रभाग ११ मध्ये पाहायला मिळणार आहे. एकीकडे पैसा, ताकद व आयात चेहरे, तर दुसरीकडे संघर्ष, सेवा आणि जनतेतून उभा राहिलेला उमेदवार अशी ही लढत राजकारणाला नवी दिशा देणारी ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
एकूणच, अनुभवी, सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि मजबूत जनसंपर्क असलेला पॅनल उभा करत राष्ट्रवादी काँग्रेसने “सामान्य माणूसही नेतृत्व करू शकतो” हा ठोस राजकीय संदेश दिला असून, आगामी महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादीसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता अधिक बळावली आहे


