राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कायम राहिल्यास दोन दिवसात संपूर्ण लॉकडाउनचा निर्णय घेऊ, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री महाराष्ट्राशी संवाद साधताना दिला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विविध राष्ट्रांनी लॉकडाउन करताना दिलेल्या पॅकेजची उदाहरणे देत टीका केली. राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. यावर टाळेबंदी हा उपाय नाही हे मान्य आहे, पण त्याला पर्याय हवा आहे. दोन दिवसांत विविध तज्ज्ञ, राजकीय नेते आणि सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पर्यायी मार्ग न सापडल्यास लोकांचा जीव वाचवण्यासाठी नाईलाजाने टाळेबंदी करावी लागेल,” असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं.
फडणवीसांनी दिलेल्या दाखल्यांचा समाचार घेत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आव्हाड यांनी फडणवीसांचा मुद्दा खोडून काढतानाच केंद्र सरकारवरही निशाणा साधला. “…पण हे सगळं तिथल्या केंद्र सरकारनी केलं आहे. आपलं केंद्र सरकार काय देणार? अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाहीत. बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून…,” असं म्हणत आव्हाडांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय…पण, २० बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय…पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे…पण, १३ बिलियन युरोचे पॅकेज मार्च २०२० मध्येच जाहीर केले… फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत…पण, ३.४ बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय…युके, जर्मनी कुठेही जा, सर्वांनीच काही ना काही दिलंय…तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा! विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल, असेही फडणवीस म्हणाले होते.