उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीला जाहीर पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि चार कार्याध्यक्ष यांना बडतर्फ करण्यात आले आहे. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शरद पवार गटाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नऊ आमदारांसह शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकारिणीने अजित पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरद पवार गटाने नऊ जणांची कार्यकारी समिती नेमली. आता अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या पदाधिका-यांना बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये पक्षातील काही आमदारांनी सहभागी होऊन मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या आमदारांविरोधात पक्षाने अपात्रतेची कारवाई सुरु केली आहे. त्याला पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठींबा दिला आहे. ही कृती पक्षाच्या ध्येय धोरणांशी विसंगत व पक्षविरोधी आहे. त्यामुळे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, राहुल भोसले, जगदीश शेट्टी आणि फजल शेख यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून, पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात आले आहे.