राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी बुधवारी अटक केली़ न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली़
दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली़ दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला तपासात आढळले. त्यानुसार ‘ईडी’ने बुधवारी ही कारवाई केली.
मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी पहाटे पाचच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी पोहोचले. त्यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवानही त्यांच्याबरोबर होते. या कारवाईबाबतची कोणतीही माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली नाही. त्यावेळी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी करायची असल्याचे सांगून (पान २ वर) (पान १ वरून) ‘ईडी’ अधिकाऱ्यांनी मलिक यांना त्यांच्याबरोबर येण्यास सांगितले. मलिक यांनी काही वेळ मागून घेतला. त्यानंतर ते ‘ईडी’ कार्यालयाकडे निघाले. त्यावेळी त्यांचे पुत्र आमीर हे त्यांच्याबरोबर होते. सकाळी साडेसातच्या सुमारास मलिक यांना ‘ईडी’च्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात आणण्यात आले. सुमारे साडेसात तास चौकशी केल्यानंतर मलिक यांना दुपारी पावणे तीनच्या सुमारास अटक करण्यात आली.
मलिक हे ‘ईडी’च्या चौकशीला सहकार्य करत नव्हते, असे सूत्रांनी सांगितले. दुपारी तीनच्या सुमारास कैसर -ए- हिंदू येथील ‘ईडी’च्या कार्यालयातून मलिक यांना जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी त्यांनी ‘झुकेंगे नही, डरेंगे नही आणि एक्स्पोज करेंगे’, अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली.
‘ईडी’ने मलिक यांना सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी ‘ईडी’च्या वतीने अतिरिक्त महान्याय अभिकर्ता (एएसजी) अनिल सिंह यांनी बाजू मांडली. दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. त्याची अनेक ठिकाणी बेकायदा संपत्ती असून ३ फेब्रुवारीला दाऊदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हसिना पारकरच्या माध्यमातून दाऊद भारतातील व्यवहार करायचा. तिच्या माध्यमातून अनेक ठिकाणी संपत्ती गोळा करण्यात आली. हसिना पारकर आणि नवाब मलिक यांच्यात आर्थिक संबंध असून, तिच्याशी संबंधित मालमत्ता नवाब मलिक यांनी खरेदी केली. कुर्ला येथील मालमत्ता ही दाऊदच्या हस्तकांशी संबंधित होती. ती नवाब मलिकांच्या कुटुंबियांची मालकी असलेल्या कंपनीच्या नियंत्रणात आहे. दाऊदशी संबंधित सात ठिकाणच्या मालमत्तेचे नवाब मलिक हे मालक आहेत. दाऊद टोळीशी संबंधित मालमत्ता हसिना पारकरचा चालक सलीम पटेल याच्याकडून मलिक कुटुंबियांनी खरेदी केली. त्यामुळे हे प्रकरण आर्थिक गैरव्यवहाराचे (मनी लॉन्डिरग) असल्याचा दावा ‘ईडी’ने १४ दिवसांची कोठडी मागताना केला.
मलिक यांच्याकडून खंडन
मलिक यांनी जमीन खरेदी व्यवहार केलेला सलीम पटेल हा हसिना पारकरचा चालक नसून, वेगळी व्यक्ती आहे, असा दावा मलिक यांचे वकिल अमित देसाई यांनी केला. मलिक यांना जबरदस्तीने अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी समन्स न देता बळजबरीने ‘ईडी’ कार्यालयात नेण्यात आले आणि तेथे स्वाक्षरी घेण्यात आली. कोणत्या कारणास्तव कारवाई करण्यात आली, याची माहितीही देण्यात आली नाही. कारवाई करण्यापूर्वी किंवा कोणतीही प्रतिबंधक कारवाई करण्यापूर्वी ‘ईडी’ने कोणतीही पूर्वसूचना दिली नाही, असा आरोपही मलिक यांच्याकडून करण्यात आला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने मलिक यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली.


