काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळेच नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. नाना पटोले आज (4 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. यानंतर नाना पटोले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी त्यांचे आभार मानले. त्यानंतर नाना पटोले थेट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे गेले. त्यांनी त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला.
वाचाः ईव्हीएम आणि मतपत्रिकेच्या मुद्द्यावर अजित पवारांनी सांगितला तिसरा पर्याय!
आता नव्या विधानसभा अध्यक्षांची नेमणूक होईपर्यंत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हेच विधानसभेचे हंगामी अध्यक्ष असतील. शरद पवारांचा निष्ठावान कार्यकर्ता, राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ हे आता विधानसभेचे हंगामी अध्यक्ष असतील. नरहरी झिरवाळ हे नाशिकमधील दिंडोरीचे आमदार आहेत. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या साथीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी झिरवाळ बेपत्ता झाले होते. काही दिवसांनंतर नरहरी झिरवाळ शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी दिसले, तेव्हा ‘माझी छाती फाडली तरी पवारसाहेब दिसतील’ असं भावनिक उत्तर देऊन झिरवाळ यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांची तोंडं बंद केली होती.