Sunday, May 17, 2026
Homeउद्योगजगतनामदेव ढसाळांचा ज्वलंत जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर; इलैयाराजांच्या संगीतासह ‘ढसाळ’ १ ऑक्टोबरला प्रदर्शित

नामदेव ढसाळांचा ज्वलंत जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर; इलैयाराजांच्या संगीतासह ‘ढसाळ’ १ ऑक्टोबरला प्रदर्शित

दलित पँथर चळवळीचे प्रणेते आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ हा बहुप्रतीक्षित चरित्रपट अखेर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. संजय पांडेय निर्मित या चित्रपटाचा भव्य पोस्टर अनावरण सोहळा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती’निमित्त मुंबईत हजारोंच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी चित्रपटाची अधिकृत प्रदर्शन तारीख जाहीर करण्यात आली असून, येत्या १ ऑक्टोबर २०२६ रोजी हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर नामदेव ढसाळ यांच्या भूमिकेत झळकणार असून, पोस्टरमधील त्यांचा लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या बंडखोर आणि तडफदार व्यक्तिमत्त्वाची झलक प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.

वरुणा मदनलाल राणा लिखित व दिग्दर्शित या चित्रपटात ढसाळांच्या संघर्षमय जीवनाचा, त्यांच्या कवितेतील विद्रोहाचा आणि समाजव्यवस्थेला हादरवून टाकणाऱ्या विचारांचा वास्तववादी वेध घेतला आहे. प्रभावी संवादांची जबाबदारी प्रताप गंगावणे यांनी सांभाळली आहे.

या चित्रपटाचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे दाक्षिणात्य दिग्गज संगीतकार इलैयाराजा यांचे संगीत. हिंदीतील प्रसिद्ध गीतकार इर्शाद कामिल आणि मराठीतील गुरु ठाकूर यांनी चित्रपटातील गाणी लिहिली आहेत.

रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी ललित प्रभाकर यांचे नामदेव ढसाळांमध्ये केलेले रूपांतर विशेष लक्षवेधी ठरत आहे. पहिल्याच लूक ट्रायलनंतर मल्लिका नामदेव ढसाळ यांनी “अगदी असाच दिसायचा नामदेव!” अशी प्रतिक्रिया दिल्याने संपूर्ण टीमला मोठा दिलासा मिळाला.

दिग्दर्शिका वरुणा राणा यांनी सांगितले की, “नामदेव ढसाळ हे केवळ व्यक्तिमत्त्व नाही, तर एक प्रक्षोभक विचार आहेत. हा चित्रपट एका कवीची कथा नसून एका चळवळीचा आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्याचा दस्तऐवज आहे.”

निर्माते संजय पांडेय म्हणाले की, “ढसाळ म्हणजेच विद्रोहाची ज्वाला. दलित समाजाला नवसंजीवनी देणाऱ्या या महान कवीचे जीवन मोठ्या पडद्यावर मांडणे हे आमच्यासाठी अभिमानासोबतच मोठे आव्हान आहे.”

I’m घोषणेनंतरपासूनच चर्चेत असलेला ‘ढसाळ’ आता प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला असून, पोस्टर आणि रिलीज डेट जाहीर झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत हा चरित्रपट एक महत्त्वपूर्ण ठसा उमटवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments