२२ जानेवारी २०२०,
नगर-बीड-परळी या रेल्वे मार्गासाठी अर्धा हिस्सा राज्य सरकारने उचलला आहे. या वर्षामधील राज्य सरकारचा हिस्सा तातडीने उपलब्ध करून दिल्यास रेल्वे मार्गाचे काम जलतगतीने सुरू होईल, त्यासाठी राज्य सरकारने तातडीने निधी द्यावा, अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संभाजीनगरच्या भेटीमध्ये केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडून या रेल्वेमार्गासाठी तातडीने 63 कोटी रूपये मंजूर केले आहेत.
बीड-नगर-परळी हा 261.25 कि.मी. लांबीचा रेल्वेमार्ग मंजूर होऊन या मार्गाचे काम सुरू झाले आहे. या मार्गासाठी 3712 कोटी रूपयाचा निधी लागणार आहे. त्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा 50 टक्के निधी देणार आहे. आतापर्यंत प्रकल्पाचे 61 टक्के काम पूर्ण झाले आहे. राज्य सरकारकडून 560 कोटी रूपये इतका निधी मिळाला आहे. आणखी 312 कोटी रूपयांचा निधी अद्याप मिळायचा आहे. त्यामुळे रेल्वेमार्गाचे काम थांबले आहे. हा रेल्वेमार्ग या तिन्ही जिल्ह्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, असे निवेदन जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. बीड रेल्वेप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे, अशी विनंती जयदत्त क्षीरसागर यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश मिळाले आहे. राज्य सरकारने त्यांच्या हिश्श्यातील निधीपैकी 63 कोटी रूपयांचा निधी रेल्वे विभागाला उपलब्ध करून दिला आहे.
धाराशिव-बीड-जालना मार्ग मंजूर झाला आहे. 2012 मध्ये या मार्गाचा सर्वे झाला आहे. 420 कि.मी.चे अंतर आहे. यात 120 कामांना मंजुरी मिळाली आहे. धाराशिव ते बीड 112 कि.मी.चे अंतर आहे. त्यात येडशीपर्यंत लोहमार्गाचे काम अस्तित्वात आहे. पुढे 80 कि.मी.कामासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन 50 टक्के सहभाग घेत हे काम मार्गी लाऊ शकते. दोन्ही मार्ग झाले तर पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण भागामध्ये पोहचता येते. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून मराठवाड्याला न्याय द्यावा, अशी मागणी जयदत्त क्षीरसागर यांनी केली. या मागणीचे निवेदनही मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.