भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारबद्दल एक गौप्यस्फोट केला असून आपल्याला तेव्हा धक्का बसल्याची कबुली दिली आहे.
महाराष्ट्रात झालेल्या २०१९मधील विधानसभा निवणुकांपासून राज्याचं राजकारण प्रचंड अस्थिर झालं आहे. निवडणुकांनंतर अनपेक्षितपणे झालेली महाविकास आघाडी, नंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देत एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड आणि आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हेदेखील सत्तेत सहभागी झाल्याने राजकारण ढवळून निघालं आहे. अशातच भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी राज्यात मागील वर्षी झालेल्या सत्तांतराबाबत ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात एक गौप्यस्फोट केला आहे. ‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे, ही कल्पना मीच माझ्या पक्षाकडे मांडली. या नव्या सरकारमधून बाहेर राहण्याचा माझा विचार होता. मात्र मला आमच्या नेतृत्वाने उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं, तो माझ्यासाठी धक्का होता,’ असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
राज्यातील सत्तांतराच्या प्रक्रियेबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि आमचं सगळं बोलणं झालं की आता हे सरकार बदललं पाहिजे, आपल्या विचाराने सरकार चालू शकत नाही, हिंदुत्ववाद्यांचा जीव गुदमरत आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी मी हा विषय मांडला की, शिंदेंनी मुख्यमंत्री झालं पाहिजे. मी माझ्या पक्षाकडे गेलो. पक्षाला सांगितलं की, शिंदे साहेबांना आपण मुख्यमंत्री केलं पाहिजे. पक्षाला कन्व्हिन्स करण्यात मला बराच वेळ लागला. काळ द्यावा लागाला. माझ्या पक्षाने लगेच ते मान्य नाही केलं. मी त्यांना म्हटलं, इतकं मोठं पाऊल एकनाथ शिंदे उचलत आहेत, अशा परिस्थितीत त्यांचं नेतृत्त्व असलं पाहिजे. त्यांच्या लोकांना कॉन्फिडन्स देईल ते. त्यानंतर पक्षनेतृत्वही तयार झालं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे फक्त पाच लोकांना माहीत होतं. त्यामध्ये मी, स्वत: एकनाथ शिंदे आणि आमच्या दिल्लीतील तीन नेत्यांचा समावेश होता. आम्ही जेव्हा पत्र घेऊन राज्यपालांकडे गेलो, तेव्हा तेही आश्चर्यचकित झाले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील, ही घोषणा पत्रकार परिषदेत मी स्वत: केली. तेव्हा माझ्या चेहऱ्यावर जराशीही नाराजी नव्हती, तर माझ्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद होता. मात्र माझा हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण घरी गेल्यानंतर मला आमच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं की, तुला उपमुख्यमंत्री व्हावं लागेल. हा माझ्यासाठी धक्का होता,’ अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना फडणवीस पुढे म्हणाले, ‘मुख्यमंत्री राहिलेलो असताना त्याच्यापेक्षा खालच्या उपमुख्यमंत्रिपदावर जावं लागतंय, याचं दु:ख नव्हतं मला. कारण माझ्या नेत्यांनी सांगितलं तर मी चपराशीही व्हायला तयार आहे. पण आपण ज्या प्रकारचं राजकारण करतो, त्याच्यामध्ये लोकं काय म्हणतील की सत्तेसाठी हा किती हपापलेला आहे? कालपर्यंत हा मुख्यमंत्री होता आणि आता सत्तेसाठी उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाला आहे. मात्र नंतर माझ्या नेत्यांनी या गोष्टीला अत्यंत वरचा स्तरावर नेलं. त्यांनी सांगितलं की आम्ही सांगतोय म्हणून हा उपमुख्यमंत्री होत आहे. या नरेटिव्हमुळे नंतर कोणाच्या मनात शंका राहिली नाही,’ असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, सत्तांतराबाबत देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या या भाष्यावर आता महाविकास आघाडीकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.