६ ऑक्टोबर २०२१,
लखीमपूर हिंसाचारानंतर पीडितांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना सीतापूरमध्ये रोखण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. यानंतर प्रियांका गांधी यांच्यावर शांतीभंग करण्याचा आणि कलम १४४ च्या उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये प्रियांका गांधी यांच्यासोबतच राज्यसभा खासदार दिपेंद्र हुड्डा आणि उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्यासहीत ११ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलीय.
प्रियांका गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी आपल्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बेल बॉन्ड भरण्यास नकार दिला आहे. प्रियांका गांधी यांनी प्रशासनानं कायद्याचं उल्लंघन करत आल्याला कैदेत ठेवल्याचा आरोप केला आहे.
‘ज्यावेळी मला ताब्यात घेण्यात आलं तेव्हा मी सीतापूर जिल्ह्यात होते. माझ्या माहितीनुसार, सीतापूर जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलेलं नव्हतं. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत तर मला हेदेखील सांगण्यात आलं नव्हतं की कोणत्या कारणामुळे मला ताब्यात ठेवण्यात आलं आहे. तसंच कोणत्या कलमांखाली मला अटक करण्यात आली, याची माहितीही मला देण्यात आली नव्हती’, असा खुलासा प्रियांका गांधी यांनी केला आहे.
‘माझ्या अटकेशी संबंधीत मला कोणतीही नोटीस किंवा आदेश दाखवण्यात आला नाही. मला कोणतीही एफआयआर उपलब्ध करून देण्यात आली नाही. माझे वकील सकाळपासून गेटबाहेर उभे आहेत. कायदेशीर सल्ला घेण्यासाठी माझ्या वकिलांची भेट घेण्याच्या अधिकारापासूनही मला वंचित ठेवण्यात आलं’, असं सांगत आपली अटकच बेकायदेशीर असल्यानं बेल बॉन्ड भरणार नसल्याचा पवित्रा प्रियांका गांधी यांनी घेतलाय.