माईर्स एमआयटीतर्फे संगीत महोत्सवाचे उद्घाटन
३१ डिसेंबर ,
देशाला संगीताने जोडले असून तो देशाचा अविभाज्य भाग आहे. संगीताने दोन धर्मांना जोडून त्याला अजरामर केले आहे. त्यामुळे हा देश कधीच तुटू शकणार नाही. येथे मुस्लीम गुरू असून शिष्य हिंदू आहे. तसेच काही ठिकाणी हिंदू गुरू असून शिष्य मुस्लीम असल्याचा इतिहास आहे, असे प्रतिपादन दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी केले. विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी विश्वराजबाग, लोणी-काळभोर येथील विश्वराज बंधारा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड अध्यक्षस्थान होते. यावेळी पटेल फाउंडेशनचे अध्यक्ष एम. के.पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालिका प्रा. ज्योती कराड-ढाकणे, माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण, संचालिका प्रा. स्वाती कराड चाटे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय, आदिनाथ मंगेशकर व प्रकुलगुरू डॉ. मिलिंद पांडे हे उपस्थित होते.
धृपद गाणारे घराणे हे मुस्लिमांचे आहे,
डॉ. जब्बार पटेल म्हणाले की, देशात अनेक संगीत घराणी आहेत. त्यात धृपद गाणारे घराणे हे मुस्लिमांचे आहे. मन तरपत हरी दर्पण के लिए’ हे गीत एका मुस्लिमाने लिहिले असून सर्वोत्कृष्ट कव्वाली हिंदू व्यक्तीने लिहिलेली आहे. जगातील सर्वोत्कृष्ट शहनाई वादक बिस्मिला खाँ एका कार्यक्रमात अमजद अली यांच्या सरोज वादनात एवढे गुंतले होते, की त्यांची नमाजाची वेळ निघून गेली. त्यावेळी ते म्हणाले होते की संगीत हीच इबादद आहे. कला आणि विज्ञान यांचा उत्तम संगम या विद्यापीठात दिसून येतो. संगीत साधना ही सर्व शास्त्रांमध्ये सर्वोच्च आहे. यात नाद व ताल आहे. नव वर्षात नादमय व तालमय होऊन पुढील वर्ष संपूर्ण देशाने याला पाळला पाहिजे. दरम्यान, डॉ. विश्वनाथ कराड यांनी एमआयटी संस्कृती संध्या ही संगीताच्या साधनेतून शांतरसाची अनुभूती देणारी असल्याचे नमूद केले.