भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतीय संविधानाने आपल्याला बहाल केले असले तरी माध्यमांवर कंट्रोल ठेवून केले जाणारे मुस्कटदाबीचे प्रयत्न निकोप लोकशाहीसाठी घातक आहेत, असा परखड सूर ’माध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भारतीय संविधान’’ या विषयावरील परिसंवादात उमटला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वात ‘माध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भारतीय संविधान’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. प्रसिध्द भाष्यकार आणि कवी रामदास फुटाणे, अभिनेते कवी सौमित्र उर्फ किशोर कदम, अभिनेते किरण माने तसेच साहित्यिक प्रा.डॉ. सुभाष वाघमारे या परिसंवादात सहभागी झाले होते.
प्रा.सुभाष वाघमारे म्हणाले बुद्ध, संत तुकाराम, महात्मा फुले, महात्मा गांधी यांच्या विचार व कार्याचा प्रभाव भारतीय संविधानावर आहे. संविधानाने आपले रक्षण करावे असे वाटत असल्यास आधी आपण संविधानाचे रक्षक बनले पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी संविधान साक्षर झाले पाहिजे. शालेय पुस्तकातील पहिले पान “भारत माझा देश आहे.” हे विद्यार्थांना शिकवले गेले पाहिजे. धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय आहे, तो घरातच ठेवला पाहिजे. बाहेर आपण सर्व भारतीय आहोत ही भावना बळकट होण्याची गरज आहे. जे अधिकार व्यक्तीला आहेत तेच अधिकार प्रसार माध्यमांना आहेत. प्रसारमाध्यमांनी भारतीय संविधानाला अनुसरून काम न केल्यास आणि विशिष्ट शक्तीला खतपाणी घातल्यास काही धर्मांध शक्ती याचा फायदा घेतील. त्यामुळे देशाच्या एकात्मतेला बाधा पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ते म्हणाले.
किरण माने म्हणाले स्वातंत्र्य, समता, बंधुता ही बुद्धांची शिकवण बाबासाहेबांनी संविधानात आणली आहे. प्रसार माध्यमांच्या वर्तनामागाचा कार्यकारणभाव नागरिकांनी समजून घेतला पाहिजे. जेंव्हा जेंव्हा आवाज दाबण्याचा प्रयत्न होईल तेव्हा बंड करायला पाहिजे. कितीही दबाव आला तरी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. अभिव्यक्त होणे हा आपला अधिकार आहे पण सत्ताधा-यांच्या विरोधात बोलले तर पोटापाण्यावर गदा आणली जाते. ही मुस्कटदाबी सहन न करता आपण याविरोधात परखडपणे बोलले पाहिजे. भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला हा अधिकार आहे. आता या संविधानाचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे.
किशोर कदम म्हणाले, प्रसार माध्यमांनी देश हितासाठी लोकांच्या मतपरिवर्तनाचे कार्य करायला पाहिजे. हक्कांचा उपभोग घेत असताना कर्तव्यांचा विसर पडणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी. संविधान सर्वांनी समजून घ्यावे.अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास करून भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे. सर्व क्षेत्रात काम करताना वेगवेगळे अनुभव येतात. माध्यमामध्ये काम करतानादेखील जातीयतेचे चटके सहन करावे लागतात. प्रतिभा असून पण आपल्याला दुय्यम ठरवले जाते अशी खंत किशोर कदम यांनी यावेळी व्यक्त केली.
रामदास फुटाणे म्हणाले समता, बंधुता आणि न्याय याला धक्का कशामुळे पोहोचतो याच्या मुळाशी जाऊन डॉ. बाबासाहेबांनी जाती निर्मुलनासाठी प्रयत्न केले. परंतू, दिवसेंदिवस जाती व्यवस्था अधिक घट्ट होत चालली आहे. त्यामुळे संविधानाला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. राजकीय सत्ताकारण अधिक प्रभावी ठरत चालले असून संविधानापेक्षा कोणताही धर्म मोठा नाही असे प्रत्येकाने समजले पाहिजे. लोकप्रतिनिधींनी तर तशी शपथ घेतली तर तो सुदिन ठरेल, कवी फुटाणे म्हणाले.