Friday, June 13, 2025
Homeताजी बातमीमहापालिका निवडणुका फेब्रुवारीत.. ? प्रभागरचना, आरक्षणाच्या माहितीचे पत्र व्हायरल झाल्याने खळबळ

महापालिका निवडणुका फेब्रुवारीत.. ? प्रभागरचना, आरक्षणाच्या माहितीचे पत्र व्हायरल झाल्याने खळबळ

मुंबई-पुण्यासह राज्यातील १५ महापालिकांच्या निवडणुका कधी होणार, याबाबतचा निर्णय आज (१७ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात होण्याची शक्यता असली, तरी महापालिका प्रशासनाच्या नावाने ‘व्हायरल’ झालेल्या एका पत्रामुळे खळबळ उडाली आहे. या पत्रात पुणे महापालिकेची आगामी निवडणूक चार सदस्यीय प्रभागरचनेनुसार झाली, तर सदस्य किती असतील, त्यामध्ये महिलांची संख्या आणि आरक्षण कसे असेल याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय हालचाली पाहता महापालिकेच्या निवडणुका फेब्रवारी महिन्यात होतील, अशी अटकळ बांधण्यात येत आहे.

मुंबई-पुण्यासह राज्यातील ११ महापालिकांची मुदत १५ मार्चला संपली. ही मुदत संपून १५ सप्टेंबरला सहा महिने पूर्ण झाले. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाबाबत सुरू असलेल्या याचिकेवर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे महापालिकांच्या निवडणुका दोन महिने पुढे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातही या निवडणुका पूर्वीच्या निर्णयाप्रमाणे तीन सदस्यीय प्रभागरचनेनुसार होणार की, नव्या सरकारच्या चार सदस्यीय प्रभागरचनेनुसार होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या नावाने ‘व्हायरल’ झालेल्या पत्रामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह उच्चपदस्थ नेत्यांचे महाराष्ट्रातील दौरे वाढू लागले आहेत. गुजरातच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात या ज्येष्ठ नेत्यांकडून विविध कार्यक्रमांसाठी हजेरी लावण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्यातील दौरा याचेच द्योतक असल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या येत्या दोन महिन्यांत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामध्येही महापालिकांच्या निवडणुका या फेब्रुवारी महिन्यात होतील, अशी अटकळ बांधण्यात येत आहे.

प्रभाग तीन सदस्यीयच…

महापालिकांच्या आगामी निवडणुका या तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसारच होतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिंदे सरकारने महापालिकांतील सदस्य संख्येबाबत घेतलेला निर्णय आगामी काळातील महापालिका निवडणुकांसाठी लागू असेल. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी ज्या महापालिकांची मुदत संपली होती, त्या महापालिकांच्या निवडणुका पूर्वीप्रमाणे म्हणजे तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होतील, अशी दाट शक्यता उच्चपदस्थ नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे महापालिकेची चार सदस्यीय प्रभाग रचना झाल्यास

एकूण नगरसेवकांची संख्या : १६६

प्रभागांची संख्या : ४२

चार सदस्यीय प्रभाग-४०

तीन सदस्यीय प्रभाग-०२

अनुसूचित जातीसाठी राखीव जागा-२२

अनुसूचित जमातीसाठी राखीव जागा-०२

नागरिकांचा मागासवर्ग -४४

महिलांसाठी आरक्षित जागा-८३

…ते पत्र निराधार

‘व्हायरल’ झालेले ते पत्र निराधार आहे. आगामी निवडणुकीत किती सदस्यीय प्रभागरचना असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे चार सदस्यीय प्रभागरचनेचे पत्र महापालिकेकडून काढण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. महापालिकेने असे कुठलेही पत्र प्रसिद्ध केलेले नाही. याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतरच याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे.- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments