पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी रुग्णालयांनी ‘दि बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट १९४९’ व महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक १४ जानेवारी २०२१ मधील तरतुदींचे काटेकोर पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंदर्भात महापालिकेने ९ एप्रिल २०२५ रोजी परिपत्रक जारी करून सर्व खासगी रुग्णालयांना सूचित केले आहे.
या अधिसूचनेनुसार, हॉस्पिटल प्रशासनाने सर्व रुग्णांशी सौजन्यपूर्ण वागणूक देणे अपेक्षित असून, विशेषतः आपत्कालीन वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णांच्या जीवित रक्षणासाठीची ‘Golden Hour Treatment’ उपचारपद्धती बंधनकारक आहे.
शासन नियम ११(जे) अंतर्गत खालील तीन महत्त्वाच्या गोष्टींवर भर देण्यात आला आहे:
1. गंभीर रुग्णांवर तात्काळ उपचार: रुग्णाच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता जीवित रक्षणासाठी प्राथमिक सेवा तत्काळ पुरविणे, आणि नंतर वैद्यकीय टिपणीसह जवळच्या उच्चस्तरीय रुग्णालयात रुग्णास संदर्भित करणे आवश्यक आहे.
2. आपत्कालीन सुविधा: प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन सेवांसाठी आवश्यक साधनसामग्री, सुविधा आणि प्रशिक्षित वैद्यकीय व परावैद्यकीय कर्मचारी असणे बंधनकारक आहे.
3. कौशल्यपूर्ण सेवा: हॉस्पिटलने आपत्कालीन परिस्थितीत जीवनरक्षणासाठी त्वरित व कौशल्यपूर्ण सेवा देणे आवश्यक आहे.
महापालिकेने स्पष्टपणे सांगितले आहे की, सर्व खासगी रुग्णालयांनी या नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे सर्व रुग्णालयांनी आपल्या सेवांमध्ये तातडीच्या उपचार पद्धतींचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.