श्वान उपद्रवाबाबतच्या तक्रारींवर प्रभाग स्तरावर तात्काळ कार्यवाही
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या पशुवैद्यकीय विभागाशी संबंधित तक्रारींचे जलद व प्रभावी निवारण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील आठही प्रभागांसाठी स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून नागरिकांच्या तक्रारींवर आता प्रभाग स्तरावर तात्काळ कार्यवाही केली जाणार आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील भटक्या श्वानांच्या उपद्रवाबाबत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने तसेच महापौर रवि लांडगेयांच्या निर्देशानुसार ही नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे नागरिक तसेच नगरसेवकांना त्यांच्या समस्या थेट संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविणे अधिक सोपे होणार आहे.
यापूर्वी पशुवैद्यकीय विभागाशी संबंधित तक्रारींचे निवारण प्रामुख्याने केंद्र स्तरावरून केले जात होते. त्यामुळे कार्यवाहीस काहीसा विलंब होत होता. मात्र आता प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र समन्वय अधिकारी नेमल्यामुळे तक्रारींचे त्वरित निराकरण होण्यास मदत होणार आहे.
महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत प्रशासकीय कामकाज अधिक सुसूत्र करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. या यंत्रणेद्वारे भटक्या श्वानांवर उपचार करणे, नसबंदी प्रक्रिया राबविणे, तसेच आक्रमक श्वानांना तात्पुरते निरीक्षणाखाली ठेवणे आदी सेवा पुरविण्यात येणार आहेत.
महापालिकेमार्फत ही सर्व कामे भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केली जाणार असून श्वानांचे स्थलांतर (Relocation) करण्यात येणार नसल्याचे पशुवैद्यकीय विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांनी आपल्या परिसरात संरक्षक कुंपण उभारणे, नोडल अधिकारी नेमणे तसेच परिसरातील श्वानांची संख्या प्रशासनाला कळविणे आवश्यक असल्याची माहितीही संबंधित संस्थांना देण्यात आली आहे.
महापौर रवि लांडगे म्हणाले की, “शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने श्वानांचा प्रश्न तातडीने मार्गी लावणे आवश्यक आहे. नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी प्रभाग स्तरावर सक्षम यंत्रणा उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यवस्थेमुळे तक्रारींचे निवारण अधिक वेगाने होईल.”
तर अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी सांगितले की, “नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक सुलभ आणि जलद व्हाव्यात हा आमचा उद्देश असून, या नवीन व्यवस्थेमुळे स्थानिक समस्यांचे निराकरण प्रभाग स्तरावरच प्रभावीपणे करता येईल.”
समन्वय अधिकारी व संपर्क क्रमांक :
• मदनुरकर इरण्णा – अ प्रभाग – ९१३०५८०७५१
• शरद राठोड – ब प्रभाग – ७७७६८१२०९०
• राहुल गुलाले – क प्रभाग – ७९७२६०९२७८
• निरज हटवार – ड प्रभाग – ७०२०३१४९४३
• समीक्षा कुंभार – इ प्रभाग – ९४२१६३२५३८
• सुरज शिंदे – फ प्रभाग – ९३७०४४३८१५
• निशिगंधा कचवे – ग प्रभाग – ९२८४८०११७७
• सुनील कांबळे – ह प्रभाग – ८८८८४४२०४६
या नव्या विकेंद्रित व्यवस्थेमुळे शहरातील पशुवैद्यकीय तक्रारींचे निवारण अधिक जलद आणि प्रभावीपणे होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


