कच-याची कमी निर्मिती, कच-याचे संकलन, विलगीकरण आणि कच-याचा पुनर्वापर आदींबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शून्य कचरा कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
केंद्र शासनाच्या सूचनांनुसार स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत पर्यावरण पुरक शाश्वत पद्धतीचा अवलंब करून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी करण्यासाठी स्वातंत्र्य दिनाचा उत्सव शुन्य कचरा कार्यक्रम म्हणून आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध सूचना निश्चित करण्यात आल्या असून त्यानुसार शासनाने दिलेल्या कार्यप्रणालीचा अवलंब केला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले. या सूचनांमध्ये कचरा कमी करणे, कचऱ्याचे योग्य पृथःकरण करणे, पर्यावरण अनुकूल उत्पादनांचा वापर वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे, कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे आदी बाबींचा समावेश आहे, असे ते म्हणाले.
कचऱ्याची निर्मिती कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने कार्यक्रमाची योजना तयार करणे, सजावट, भांडी आणि इतर कार्यक्रमासंबंधी वस्तूंसाठी पुनर्वापर करण्यायोग्य किंवा कागद, पताका, कार्डबोर्ड, लाकुड अशा कम्पोस्टेबल सामग्रीच्या वापरास प्राधान्य देणे, सजावटीसाठी फुगे किंवा थर्माकॉलचा वापर टाळणे, कचऱ्याचे रिसायकल, कम्पोस्टेबल आणि नॉन रिसायकल करण्यायोग्य वस्तूंचे योग्यरित्या विलगीकरण करणे, पर्यावरणास अनुकूल उत्पादने वापरण्यावर भर देणे, शुन्य कचरा कार्यक्रमाच्या उद्दिष्टांबद्दल नागरिकांना शिक्षित करुन सक्रीयपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे, माहितीपुर्ण चिन्हे प्रदर्शित करून कार्यक्रमादरम्यान कचरा कसा कमी करावा याबद्दल मार्गदर्शन करणे, कार्यक्रमांचे बॅनर कार्डबोर्ड, कापड किंवा लाकूड आदी वस्तूंपासून तयार करणे, कार्यक्रमानंतर कार्यक्षम कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्यासाठी योजना विकसित करून गोळा केलेल्या सर्व कचऱ्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया करणे, यासाठी स्थानिक कचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांना सहभागी करून घेणे अशा प्रमुख सूचनांचा शून्य कचरा कार्यक्रमात समावेश आहे. त्या दृष्टीने महापालिकेने सर्व विभागांना अवगत केले असून या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आरोग्य विभागामार्फत देण्यात आले आहेत.