महापालिकेने ३१ डिसेंबर २०२० पूर्वी गुंठेवारीनुसार झालेली अनधिकृत बांधकामे नियमित करणाची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेसाठी बांधकाम पूर्णत्वाचा, करसंकलन विभागाचा आणि जलनिस्सारण विभागाचा ‘ड्रेनेज कनेक्शन’ दाखला बंधनकारक करण्यात आला होता. मात्र, आता या दाखल्यांऐवजी मालमत्ताधारकाचे अर्थात जागामालकाचे प्रतिज्ञापत्र आणि आर्किटेक्ट यांचा दाखला घ्यावा; तसेच बांधकामे नियमित करणाबाबतच्या परिपत्रकात दुरुस्ती करावी, असा निर्णय महापालिका स्थायी समिती सभेने घेतला.
महापालिकेच्या मुख्यालयात झालेल्या स्थायी समितीच्या सभेत नितीन लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. शहरात ३१ डिसेंबर २०२०पूर्वी झालेली गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. त्यासाठीच्या कागदपत्रांमध्ये दुरुस्ती करण्याची उपसूचना मंजूर करण्यात आली आहे. गुंठेवारीचे बांधकाम नियमित करण्यासाठी मालमत्ताधारकांना कागदपत्रांसह २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी आदेश काढला आहे. त्यानुसार, बांधकाम नियमितीकरणासाठी ३१ डिसेंबर २०२० पूर्वी बांधकाम पूर्णत्वाचा करसंकलन विभागाचा आणि जलनिस्सारण विभागाचा ड्रेनेज कनेक्शन दाखला अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. त्याऐवजी मिळकतधारकाचे अर्थात जागा मालकाचे प्रतिज्ञापत्र आणि आर्किटेक्ट यांचा दाखला घ्यावा. बांधकामाची २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षांची मालमत्ताकर भरणा पावती घ्यावी. मालमत्ताकर भरलेला नसल्यास करसंकलन विभागाने कर भरण्यासाठी दिलेली मागणी पावती अर्जासोबत घेण्यात यावी. यानुसार परिपत्रक काढावे, अशी उपसूचना स्थायी समितीने मंजूर केली.
महापालिकेने गुंठेवारीनुसार झालेली अनधिकृत बांधकामे नियमित करणाची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेसाठी आता मालमत्ताधारकाचे अर्थात जागा मालकाचे प्रतिज्ञापत्र आणि आर्किटेक्ट यांचा दाखला जोडला तरी चालणार आहे. – नितीन लांडगे, अध्य़क्ष, स्थायी समिती