ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटचा धोका लक्षात घेता महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवून आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र कोरोनाचे संकट अद्याप दूर झाले नसल्याने नागरिकांनी कोरोनासंबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी शहरवासियांना केले आहे.
सध्या आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तीत विषाणूंचा फैलाव वाढत असल्याने केंद्र आणि राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे सूचित केले आहे. त्याअनुषंगाने परदेशातून पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या नागरिकांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने तपासणी करण्यात येत आहे. नायजेरिया मधून या शहरात आलेल्या दोन आणि संपर्कातील एक अशा तीन रुग्णांचे कोविड-१९ तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांना महापालिकेच्या पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालयात दाखल केले असून संपर्कातील नागरिकांना गृहविलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा उत्परिवर्तीत विषाणू इंग्लंडसह युरोपातील देश, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, चीन, मॉरिशस, बोत्सवाना, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्राईल या देशांमध्ये आढळून येत आहे. नायजेरिया या देशामध्ये हा विषाणू अद्याप आढळून आलेला नाही. परदेशातून पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या नागरिकांनी ८८८८००६६६६ या कोविड हेल्पलाईनवर माहिती कळवावी असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. या नागरिकांच्या कोरोना संबंधित चाचण्या तसेच गृहविलगीकरण अथवा उपचाराच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यासाठी महापालिका यंत्रणा तयार ठेवण्याचे आदेश महापौर माई ढोरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. मास्कचा वापर करण्यासोबतच कोरोना संबंधी असलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी यावेळी केले.