जगात कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या ओमीक्रॉन विषाणूचा धोका निर्माण झाला. याबाबत केंद्र सरकारने आवश्यक त्या सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशावर लक्ष ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पुण्यात काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका प्रवाशावर पुणे महानगर पालिकेने विशेष लक्ष दिले आहे. त्या नागरिकाला घरीच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे. या नागरिकाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यातील विषाणू हा ओमीक्रॉन आहे का? यासाठी हा अहवाल प्रयोगशाळेकडे पाठवून त्याची तपासणी केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे.
सर्वत्र निर्माण झालेला ओमीक्रॉन विषाणूचा धोका लक्षात घेत, महानगरपालिकेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. महानगरपालिकने केवळ दक्षिण आफ्रिकाच नव्हे तर हॉंगकॉंग, ऑस्ट्रिया, झिंम्बाब्वे, जर्मनी, ईस्त्राईल यादेशातून आलेल्या नागरिकांचीही माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. ओमीक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्याप्रमाणे महानगरपालिकेने शहरातील विमातळ प्रशासनाकडून परदेशातून पुण्यात आलेल्या नागरिकांची माहिती मागवली आहे. यामध्ये वीस दिवसांपूर्वी एका नागरिक दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आल्याचे समोर आले आहे. महापालिकेने तात्काळ त्याचा शोध घेत, त्याला नव्याने केलेल्या चाचणीचा अहवाल येईपर्यंत घरीच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत .
सद्यस्थितीला ज्या देशात हा विषाणू आढळून आला आहे. त्या देशातून पुण्यात येण्यासाठी थेट विमान सेवा नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शहरत येणाऱ्या नागरिकांची माहिती जमवण्याचे काम महानगरपालिकेने सुरु केले आहे. दुसरीकडे शहरातील रुग्ण संख्याही शंभरच्या आता आहे. परंतु पूर्वीच्या तुलनेत त्यात वाढ झाली असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.