Tuesday, April 21, 2026
Homeताजी बातमीमहापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वात ‘शिवगर्जना’ महानाट्याचे आयोजन

महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वात ‘शिवगर्जना’ महानाट्याचे आयोजन

१७, १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘शिवगर्जना’ या २५० हून अधिक कलाकार उंट,घोडे यांसह भव्य महानाट्याचे सादरीकरण…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान ‘विचार प्रबोधन पर्वा’चे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांच्या विचारांचे, पराक्रमाचे आणि सुशासनाच्या तत्त्वांचे स्मरण करून नव्या पिढीला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पर्वाअंतर्गत निगडी येथील नियोजित महापौर निवास परिसरात १७, १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. मा. राष्ट्रपती महोदय यांच्या समोर सादर झालेल्या या भव्य महानाट्यप्रयोगामध्ये सुमारे २५० हून अधिक कलाकारांचा सहभाग असून घोडे,उंट तसेच आकर्षक नेपथ्य,नेत्रदीपक अतिषबाजी, प्रकाशयोजना व ध्वनीसंयोजनाच्या माध्यमातून शिवचरित्रातील महत्त्वपूर्ण प्रसंग प्रभावीपणे उभे करण्यात येणार आहेत.महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता या महानाट्याचा शुभारंभ होणार आहे.

‘शिवगर्जना’ या महानाट्यात शिवाजी महाराज यांच्या जन्माआधीचा काल, छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण, संत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांची भेट (भक्ती शक्ती भेट), तोरणा विजय,स्वराज्य स्थापनेचा संघर्ष, शेतकऱ्यांसाठीचे आज्ञापत्र, प्रतापगड मोहीम, पन्हाळगड वेढा आणि सुटका, स्वराज्य आरमार उभारणीचा प्रसंग, पुरंदरचा तह, आग्रा भेट, नरवीर तानाजी मालुसरे यांचा कोंढाणा जिंकण्याचा प्रसंग आणि नेत्र सुखद करणारा भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळा यांसारखे ऐतिहासिक प्रसंग सजीव स्वरूपात सादर केले जाणार आहेत. इतिहासाची भव्यता आणि राष्ट्राभिमान जागविणारा हा नाट्यप्रयोग नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमूख उपस्थिती तसेच खासदार मेधा कुलकर्णी,सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ.अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, शंकर मांडेकर, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उपमहापौर शर्मिला बाबर, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, शहरातील नगरसदस्य, नगरसदस्या तसेच महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे यांची देखील उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, शिवप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते तसेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

कार्यक्रमस्थळी नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था तसेच आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

  छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कर्तृत्व हे प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. महापालिकेच्या वतीने आयोजित विचार प्रबोधन पर्वाच्या माध्यमातून शिवरायांचे जीवनकार्य आणि स्वराज्याचा संदेश शहरवासियांपर्यंत पोहोचविणे हा हेतू असून ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याचा लाभ नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून घ्यावा आणि शिवरायांच्या विचारांपासून प्रेरणा घ्यावी. – रवि लांडगे,  महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments