केंद्र शासन व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत डुडूळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या १ हजार १९० तसेच किवळे येथे आर्थिक दुर्बल घटकांसाठी उभारण्यात आलेल्या ७५५ सदनिकांची संगणकीय सोडत सोमवार, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महापालिकेच्या अधिकृत फेसबुक तसेच युट्यूब चॅनेलवर करण्यात येणार आहे.
या सोडत कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
याशिवाय खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर मांडेकर, शंकर जगताप, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य अॅड. गोरक्ष लोखंडे तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे व तृप्ती सांडभोर यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.
दरम्यान, डुडूळगाव व किवळे येथील एकूण १,९४५ सदनिकांसाठी महापालिकेच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांची संगणकीय सोडत निश्चित करण्यात आली असून ही सोडत सोमवार, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिली आहे.


