पहिल्या टप्प्यात अक्षय सावंत यांच्या कुटुंबाला १० लाख जमा, इतर आठ मृतांच्या वारसांची कागदपत्रे पूर्ण होताच आर्थिक मदत खात्यात जमा होणार; महापौर रवि लांडगे यांची माहिती
पिंपरी, दि. १६ जुलै २०२६ : मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ नागरिकांच्या कुटुंबीयांना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या प्रक्रियेअंतर्गत मृत अक्षय सावंत (वय ३२) यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात १० लाख रुपयांची मदत जमा करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
महापौर रवि लांडगे यांच्या निर्देशानुसार आर्थिक मदत तातडीने वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर अक्षय सावंत यांच्या पत्नी हर्षदा सावंत यांच्या खात्यात ३४ टक्के, तर आई रेश्मा सावंत आणि वडील राजू सावंत यांच्या खात्यात प्रत्येकी ३३ टक्के रक्कम जमा करण्यात आली.
दरम्यान, मृत भावेश वाणी (३३), सुनील कोरके (४०, आळंदी), सन्नी माने (३९, गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (३३, छत्रपती संभाजीनगर), नागेश गायकवाड (२६, संजय गांधी नगर, मोशी), रणजीत पाटील (२२, मोशी), राहुल गायकवाड (२३, मोशी) आणि वामन कसबे (५०, मोशी) यांच्या वारसांच्या कागदपत्रांची पूर्तता युद्धपातळीवर सुरू असून, ती पूर्ण होताच त्यांच्या खात्यातही आर्थिक मदतीची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
महापौर रवि लांडगे म्हणाले…
“मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी जलदगतीने सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होताच मदतीची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. या कठीण प्रसंगीबाधित कुटुंबांच्या पाठीशी महानगरपालिका ठामपणे उभी आहे. तसेच शहरातील सर्व वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पांतील सुरक्षा व्यवस्थेचासर्वंकष आढावा घेऊन आवश्यक सुधारणा तातडीने राबविण्यात येत आहेत.”


