Tuesday, February 11, 2025
Homeमहाराष्ट्रआचारसंहितेच्या शक्यतेने राजकारण्यांसारखीच महापालिका प्रशासकांची घाई; तब्बल ३५० कोटींच्या कामांना मंजुरी

आचारसंहितेच्या शक्यतेने राजकारण्यांसारखीच महापालिका प्रशासकांची घाई; तब्बल ३५० कोटींच्या कामांना मंजुरी

आगामी लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसांत लागण्याची शक्यता असल्याने महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आठवड्यात दोनदा स्थायी समितीची बैठक घेतली. दाेन बैठकांमध्ये सुमारे साडेतीनशे काेटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता दिली आहे. त्यामुळे राजकारण्यांप्रमाणेच आचारसंहितेच्या शक्यतेने आयुक्तांनीही काेट्यवधींच्या विकासकामांच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करून घेतली आहे.

महापालिकेत १३ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. आयुक्त शेखर सिंह हेच प्रशासक म्हणून कारभार पाहत आहेत. आयुक्त सिंह महापालिकेत आल्यापासून यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाई, महापालिकेची इमारत, माेशीतील ७५० खाटांचे रुग्णालय यांसह विविध माेठ्या खर्चाच्या विषयांना मंजुरी दिली आहे. आता येत्या काही दिवसांत लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त शेखर सिंह यांनी विकासकामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला आहे. दाेन-दाेन आठवडे स्थायी समितीची बैठक न घेणाऱ्या आयुक्तांनी २७ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी एकाच आठवड्यात दाेन वेळा स्थायी समितीची बैठक घेतली. मंगळवारच्या बैठकीत १०७, तर शुक्रवारच्या बैठकीत ८७ अशा १९४ विषयांच्या सुमारे साडेतीनशे काेटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे.

प्रमुख विकासकामे !

पिंपरी चाैक ते हॅरिस पूल दापाेडी अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार रस्ता विकसित करणे (१०९ काेटी ३७ लाख), पिंपरी चाैक ते भक्ती-शक्ती चाैकापर्यंत अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करणे (५९ काेटी सहा लाख), माेशीतील धर्मवीर संभाजीमहाराज यांच्या पुतळा परिसरात शंभूसृष्टी उभारणे (१५ काेटी), पाणी मीटरच्या नाेंदी, देयके देण्यासाठीच्या (३३ काेटी) विषयांना मंजुरी दिली आहे. मुकाई चाैक ते चिखली स्पाईन राेड विकसित करणे (१४ काेटी सहा लाख), भक्ती-शक्ती ते मुकाई चाैक बीआरटी मार्ग विकसित करणे (१७ काेटी ३४ लाख), अग्निशामक विभागासाठी १६० नग पर्सनल फायर प्राेटेक्शन खरेदी (पाच काेटी २० लाख), पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यासाठी (४५ लाख), महापालिका मुख्य इमारतीमधील अंतर्गत व बाह्य दैनंदिन स्वच्छता आदी कामे (६८ लाख), थेरगाव रुग्णालयातील विविध कामे (दोन काेटी ३८ लाख), थेरगावमध्ये बहुउद्देशीय इमारत बांधणे (७३ लाख), चिखलीत सांडपाणी पाणी प्रक्रिया प्रकल्प देखभाल-दुरुस्ती (एक काेटी दहा लाख), पीएमपीचे विविध पास (चार काेटी २९ लाख), दिव्यांग भवन संचलन (दोन काेटी), थेरगाव, जिजामाता रुग्णालयासाठी ‘सीआर्म’ मशिन खरेदी (एक काेटी ६५ लाख), मासूळकर नेत्र रुग्णालयासाठी मशिन खरेदी (५५ लाख) अशा विविध विषयांना मान्यता दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments