शहरात अनधिकृतपणे सुरु असलेल्या तसेच हवा आणि ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरत असलेल्या आर.एम.सी. (रेडीमिक्स क्राँक्रीट) प्लॅन्ट वर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून कारवाई करण्यात आली.
शहरातील आर.एम.सी. (रेडीमिक्स क्रॉक्रीट) प्लॅन्ट मधून मोठ्या प्रमाणात उडणा-या धूळीमुळे नागरिकांना श्वसनाचा तसेच त्या प्रकल्पांमधून निघणाऱ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत असून त्याबाबत महापालिकेच्या पर्यावरण विभागास तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन महापालिकेने मे.एस.व्ही.टी.एन.कंन्स्ट्रक्शन प्रा.लि. तर्फे सोमानी टॉवर्स, प्लॉट नं. २५, गायकवाडनगर, पुनावळे पुणे तसेच ऐश्वर्यम हमारा, आर.एम.सी. (रेडीमिक्स क्रॉक्रीट) प्लॅन्ट चिखली येथे प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील तसेच महापालिकेकडील ना-हरकत दाखला व इतर अनुषंगिक आवश्यक असणारी परवानगी घेणे अनिवार्य असते. परंतु पाहणीवेळी ही परवानगी न घेता अनधिकृतपणे व्यवसाय चालवित असल्याचे तसेच नागरिकांनी केलेल्या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे महापालिकेच्या पथकास निदर्शनास आले आहे.
पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली २२ एप्रिल २०२४ रोजी पर्यावरण पथकातील प्रदीप महाले, जगन्नाथ काटे, बाबासाहेब ढोकळे, कनिष्ठ अभियंता स्वप्निल पाटील, मल्टिपर्पज वर्कर गोरक्षनाथ करपे तसेच एमएसएफ व मेस्को जवानांच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करून कारवाई केली.
पुनावळे येथील मे.एस.व्ही.टी.एन.कंन्स्ट्रक्शन प्रा.लि. तर्फे सोमानी टॉवर्स तसेच चिखली येथील मे. ऐश्वर्यम हमारा येथे सुरु असलेला आर.एम.सी. (रेडीमिक्स क्रॉक्रीट) प्लॅन्ट सील करण्यात आला आहे.
यापुढे महापालिकेच्या हद्दीत विनापरवाना व्यवसाय आणि वायू, ध्वनी प्रदूषण करत असल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.