रावेत येथील इको पार्कची जागा ही बनावट पंचनामा करून हस्तांतरित करण्यात आली. या ठिकाणी निवडणूक आयोग अनधिकृत बांधकाम करत असल्याचा आरोप करत त्यासाठी वृक्षतोड केल्याच्या निषेधार्थ पर्यावरणप्रेमींनी मुंडन आंदोलन केले. रावेतमधील इको पार्क गेल्या काही महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे. याकडे महापालिका, पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालय जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. पाण्याअभावी झाडे मारली जात आहेत, तेथील जैवविविधता नष्ट करण्यात येत आहेत.
ही झाडे जगविण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले असून, इको पार्क सर्वांसाठी खुला करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, हे पार्क खुले न केल्याने प्रशासनाच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून इको पार्कमधील झाडे पाण्याअभावी सुकत आहेत. डिसेंबरमध्ये पर्यावरणप्रेमींनी उद्यान विभागाकडे सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. त्यात सुमारे १४० दुर्मिळ झाडे सुकल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी झाडे वाचविण्यासाठी स्वखर्चाने टँकरने पाणी सोडले. तसेच झाडांना पाणी मिळावे, ती जगावीत यासाठी हे पार्क खुले करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती पर्यावरणप्रेमी प्रशांत राऊळ यांनी दिली.