मुंबई: अँटालिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना काहीसा दिलासा मिळाला आहे. तब्बल 27 दिवस एनआयएच्या कोठडीत असलेल्या सचिन वाझेंना 23 एप्रिलपर्यंत न्यायालीयन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष एनआयए कोर्टाने दिले आहेत.
तब्बल 27 दिवस एनआयएच्या कोठडीत असणाऱ्या वाझेंना आज एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने त्यांना 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर वाझेंच्या वकिलाने वाझेंसाठी कोर्टाकडे तुरुंगात सुरक्षित सेल देण्याची मागणी केली आहे. सुरक्षा आणि संरक्षणाच्या दृष्टीने हा सेल देण्यात यावा, असं वाझेंच्या वकिलाने म्हटलं आहे. तर, वाझेंची तळोजा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
सीबीआयने कोर्टात आज एक अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांनी वाझे आणि विनायक शिंदे यांची डायरी आणि इतर कागदपत्रं आदी पुराव्यांचा तपास करायचा असून या तपासाची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. कोर्टाने ही विनंती मान्य केली आहे. सीबीआयला ज्या काही दस्ताऐवजांची गरज आहे, ती देण्यात यावीत, असे आदेश कोर्टाने एनआयएला दिले आहेत.