मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आज पुन्हा मंदावला आहे. महामार्गावर अचानक वाहनांची संख्या वाढल्याने अशी परिस्थिती उद्भवली असल्याचे बोलले जात आहे. सुट्ट्यांमुळे आज सकाळपासूनच माहामर्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग हा पुणे आणि मुंबईला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या महामार्गावर काल रात्रीपासून अवजड वाहने असल्याचे वाहतूक कासव गतीने सुरू होती. महामार्गावरील बोरघाटात वाहतूक कोंडीमुळे अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. वाहनांची संख्या अचानक वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलीस दहा दहा मिनिटांच्या ब्लॉक घेऊन पुण्याकडे येणारी वाहतूक दोन्ही मार्गांवरून सोडत आहेत. तसेच पुढील काही वेळात ही वाहतूक कोंडी सुटेल अशी पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे.