Saturday, March 2, 2024
Homeमहाराष्ट्रजल्लोष शिक्षणाचा पर्व २ चे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते...

जल्लोष शिक्षणाचा पर्व २ चे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते उद्घाटन…

शाळांच्या गुणवत्ता वाढीची जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता त्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक समितीमध्ये निर्माण झाली पाहिजे, त्यातूनच शाळांचा दर्जा वाढण्यासोबतच मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल आणि हाच खऱ्या अर्थाने शिक्षणाचा जल्लोष साजरा करण्याचा दिवस असेल, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधील स्पर्धात्मक, गुणात्मक तसेच नाविन्यपूर्ण विचार वाढीकरिता “जल्लोष शिक्षणाचा २०२३-२४” या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते निगडी येथील ग दि माडगूळकर सभागृह येथे करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, आकांक्षा फाउंडेशनच्या जयश्री ओबेरॉय तसेच मुख्यध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

भारत दर्शन हा विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी महत्वपूर्ण उपक्रम आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभांमध्ये वाढ होऊन यशस्वी बनण्याच्या त्यांच्या आकाशांना आणि स्वप्नांना अधिक बळ मिळेल. तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, कोअर टीम यांनी पालकांना तसेच विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सांघिक पद्धतीने जल्लोष शिक्षणाचा हा महत्वाकांक्षी उपक्रम यशस्वी करण्यासाठी काम केले तर महापालिका शाळांमध्ये नक्कीच आमूलाग्र बदल घडेल, असा विश्वास आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.

जल्लोष शिक्षणाचा हा दोन दिवसांचा उपक्रम नाही. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सांस्कृतिक, शारीरिक विकास होण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या अनेक उपाययोजना आणि घटक आहेत ज्यांची अंमलबजावणी मुख्यध्यापक आणि शिक्षकांनी वर्षभर केली पाहिजे असे आयुक्त सिंह यावेळी म्हणाले. तसेच शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचे धोरण कायम राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रशासन अधिकारी संजय नाईकडे म्हणाले, आयुक्त शेखर सिंह यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या अर्जित रजा, सोयीसुविधा असे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. शिक्षकांनीही आता शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी यशस्वी प्रयत्न करावेत.

जल्लोष शिक्षणाचा पर्व २ मध्ये सर्व घटकांचा समावेश करण्यात आला असून विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती यांचा सहभाग असणार आहे. यावर्षी शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देण्यात येणार आहे आणि बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक असे तीन विभाग करण्यात आले आहेत. मुल्यांकनासाठी शाळा सिद्धी हाच पायाभूत घटक निर्धारित करण्यात आला आहे. तसेच शाळेला अतिरिक्त निधी पुरविण्यात येणार आहे, अशी माहितीही प्रशासन अधिकारी नाईकडे यांनी यावेळी दिली.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, जल्लोष शिक्षणाचा या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांची सर्जनशीलता आणि कल्पना प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करून देण्यात आले असून याद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, क्रीडा, कला, हस्तकला, तंत्रज्ञान आदी विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच त्यांच्या कल्पक विचारसरणीला चालना देण्यासाठी मदत मिळत आहे. यातील खरा केंद्रबिंदू जरी विद्यार्थी असला तरी मुख्य घटक शिक्षक आहे.

शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये कौतुकास्पद कामगिरी विद्यार्थ्यांची भारत दर्शन सहल चांगल्या रितीने पार पडली आणि यातून विद्यार्थ्यांना अनेक नवनवीन गोष्टींची माहिती मिळाली. पुढील वर्षीही अशाच सहलीचे आयोजन करण्यात येणार असून सहलीमध्ये भाग घेणाऱ्या आणि पुढील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याची जबाबदारी आता शिक्षकांची असणार आहे, असेही अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यावेळी म्हणाले.

भारत दर्शन सहलीवरून परतलेली विद्यार्थीनी नेहा शिंदे म्हणाली, या सहलीमुळे विमानात बसण्याची संधी मिळाली आणि आमच्या स्वप्नांना आकाशात झेप घेण्याची अनुभूती आली. विमानात बसण्याचे आणि भारत फिरण्याचे स्वप्न विद्यार्थी दशेत पूर्ण होईल असे वाटले नव्हते. भारत दर्शन यात्रेतून आमच्या ज्ञानात भर पडली आणि इसरो सारख्या ठिकाणी जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोन मिळाला. तसेच विविध शैक्षणिक संस्थांना भेट देऊन आमच्या ज्ञानाच्या कक्षाही रुंदावल्या.

भारत दर्शन सहलीवरून परतलेल्या विद्यार्थीनीचे वडील विकास ठाकूर म्हणाले, आम्ही सर्वसामान्य कुटूंबातील आहोत. आम्ही आतापर्यंत आमच्या मुलांना राज्याबाहेर देखील घेऊन फिरू शकलो नाही. आमचं हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल आणि आमच्या पाल्यांच्या उत्कर्षाला संधी दिल्याबद्दल महापालिकेचे आभार. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महापालिका शाळेतील शिक्षक गणेश लिंगडे यांनी केले तर पर्यवेक्षक साहेबराव सुपे यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच यावेळी भारत दर्शन दौऱ्यावरून परतलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुकही करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments