जून महिन्यातील एकूण सरासरी पावसातील सुमारे ९० टक्के पाऊस अवघ्या गेल्या सहा दिवसांत उपनगरांमध्ये पडला.
जून महिन्यातील एकूण सरासरी पावसातील सुमारे ९० टक्के पाऊस अवघ्या गेल्या सहा दिवसांत उपनगरांमध्ये पडला. साधारण जूनच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत मोसमी पाऊस मुंबईत दाखल होतो. त्यापूर्वी मे अखेरीपासूनच पूर्व मोसमी पाऊस सरी बरसू लागता. यंदा मात्र मोसमी पावसाचे आगमन उशिराने झाले.
मुंबई आणि परिसरात मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर पहिल्याच आठवडय़ात जून महिन्यातील (१ ते ३० जून) सरासरीच्या तुलनेत जवळपास ९४ टक्के पाऊस उपनगरांमध्ये पडला.जून महिन्यात (१ ते ३० जून) मुंबई उपनगरांत सरासरी ५३६.१ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा २९ जून सायंकाळपर्यंत ५०२.९ मिलिमीटर पावसाची नोंद सांताक्रुझ केंद्राने केली आहे. त्यानुसार जूनमध्ये होणाऱ्या सरासरी पावसापैकी जवळपास ९४ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. त्यातील ९० टक्के म्हणजे ४८५ मिलिमीटर पाऊस हा २४ ते २९ जून या अवघ्या सहा दिवसांत झाला.मुंबई शहरात तुलनेने तूट अधिक आहे. मात्र, तेथेही गेल्या सहा दिवसांतील पावसाने तुटीचे प्रमाण कमी केले आहे. कुलाबा केंद्रात जूनमध्ये सरासरी ५४२.३ मिलिमीटर पावसाची नोंद होते.