Tuesday, February 27, 2024
Homeताजी बातमीखासदार अमोल कोल्हे यांचा नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल आळंदीत आत्मक्लेश…!

खासदार अमोल कोल्हे यांचा नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल आळंदीत आत्मक्लेश…!

राष्ट्रवादी काँग्रेचे शिरुरमधील खासदार अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात साकारलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेमुळे मागील काही दिवसांमध्ये राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांकडूनही त्यांच्या भूमिकेवरून टीका-टिप्पणी केली गेली. शिवाय, या चित्रपट प्रदर्शनास विरोधही दर्शवला गेला. तर, अमोल कोल्हे यांनी देखील आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले. परंतु, राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या विविध चर्चा काही थांबल्या नाहीत. राज्यातील मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसने देखील यावरून आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी अखेर नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल आळंदीत आत्मक्लेश केला.

या वेळी माध्यमांशी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, “जो एक सिनेमा ओटीटी वर प्रदर्शित होणार आहे, जो मी २०१७ मध्ये केला होता.‘व्हाय आय किल्ड गांधी’ त्यामध्ये मी केलेल्या भूमिकेच्या संदर्भात अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि त्याही पेक्षा जास्त महत्वाचं मला हे वाटतं, की अनेकांनी मला व्यक्तिशा ही गोष्ट सांगितली की आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातही स्वीकारलं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात स्वीकारलं आणि त्यानंतर आम्हाला तुम्हाला या अशा भूमिकेत बघणं खरंतर आम्हाला पसंत पडलेलं नाही आणि त्यांच्या विचारांना हा धक्का लागला, त्याची नाराजी अनेक युवा कार्यकर्त्यांनी माझ्यापर्यंत पोहचवली. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांच्याबद्दल मी नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो. २०१७ मध्ये अजानतेपणे जी गोष्ट झाली, त्यामुळे ज्यांच्या कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो.” असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

तसेच, “कारण, जी भूमिका मी केली तो विचार, त्या विचारधारेचं समर्थन मी कधीही केलेलं नाही, कधी करणार नाही हे मी या पूर्वीच स्पष्ट केलेलं आहे. आणि यानंतर नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जी भूमिका मी भविष्यात घेईन ती लवकरच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर मांडणार आहे. ज्या युवा पिढीने माझ्यावर हा विश्वास दाखवला, त्यांच्या मनात देशाच्या इतिहासाविषयी, राष्ट्रपित्यांबाबत, राष्ट्रपुरूषांबाबत एक संशयाचं वातावरण निर्माण होऊ नये. यासाठी मला वाटतं मी ही भूमिका घेणं आणि ती स्वच्छपणे समोर मांडणं हे मला जास्त गरजेचं वाटतं. म्हणूनच आज महात्मा गांधीजींच्या पूर्वसंध्येस जिथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या, त्या इंद्रयणीच्या काठी आळंदीला मी येऊन महात्मा गांधीजींना अभिवादन केलं. आज देशपातळीवर जे विखाराचं वातावरण तयार केलं जातंय त्या विखाराच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर बापूजींना मी हीच प्रार्थना केली जी त्यांनी आपल्याला दिली ती म्हणजे या विखाराच्या वातावरणात सबको सन्मती दे भगवान…” असं अमोल कोल्हे यांनी यावेळी बोलून दाखवलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments