Sunday, August 16, 2026
Homeअर्थविश्वमोशी वेस्ट-टू-एनर्जी दुर्घटना : मृतांचा आकडा आठवर; इमारतीतील शोधकार्य पूर्ण, आणखी एका...

मोशी वेस्ट-टू-एनर्जी दुर्घटना : मृतांचा आकडा आठवर; इमारतीतील शोधकार्य पूर्ण, आणखी एका व्यक्तीचा शोध सुरू

मोशी, प्रतिनिधी :

मोशी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत महत्त्वाची प्रगती झाली आहे. आज ७ जणांचे मृतदेह काढण्यात आले तसेच प्रशासकीय इमारतीत अडकलेल्यांची मृत्यू संख्या एकूण आठ झाली आहे. मात्र, इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली आणखी एक व्यक्ती अडकल्याची शक्यता असून तिचा शोध अद्याप सुरू आहे.

या दुर्घटनेनंतर आज उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, प्रशासकीय इमारतीतील शोधकार्य पूर्ण झाले असून आत अडकलेल्या सर्व व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे. आता बाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि इतर यंत्रणांची संयुक्त मोहीम सुरू आहे.

बुधवारी घडलेल्या या दुर्घटनेत एकूण २३ जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी १४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, तर आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उर्वरित एका व्यक्तीचा शोध अद्याप सुरू असल्याने बचावकार्य अखंड सुरू आहे.

यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयात नेल्यानंतर आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी खालील सात जणांना मृत घोषित केले असून आठव्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

मृतांची नावे :

• अक्षय सावंत (वय ३५, रा. मोशी)

• सुनील कोरके (वय ४०, रा. आळंदी)

• सन्नी माने (वय ३९, रा. गंधर्वनगरी, मोशी)

• महेश कुंभार (वय ३३, रा. छत्रपती संभाजीनगर)

• नागेश गायकवाड (वय २६, रा. मोशी)

• रणजीत पाटील (वय २२, रा. मोशी)

• एका मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही

• आणखी एका जणाचा शोथ सुरु आहे . 

या दुर्घटनेमुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात शोककळा पसरली असून, दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा शोध लागेपर्यंत बचाव मोहीम सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments