मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनी अँटोनी लारा रिन्युएबल यांना तात्काळ नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याचे आदेशही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
या संदर्भात आज महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
८ जुलै रोजी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास मोशी येथील कचरा डेपोमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत इमारतीत २२ आणि इमारतीशेजारी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली १ असे एकूण २३ नागरिक अडकले होते. त्यापैकी पाच जण स्वतः सुखरूप बाहेर पडले, तर बचाव पथकाने आणखी नऊ जणांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेनंतर भारतीय सेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि इतर संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे अनेक तास बचावकार्य राबविले.
दुर्घटनेची गंभीर दखल घेत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनी अँटोनी लारा रिन्युएबल यांना तातडीने नोटीस बजावून त्यांचा खुलासा मागविण्याचे निर्देश दिले आहेत. चौकशी अहवालाच्या आधारे पुढील प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


