पिंपरी-चिंचवड : मोशी कचरा डेपोजवळ झालेल्या इमारत दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अंदाजे आठ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीभोवतीचा मलबा हटवून जवानांना सुरक्षित प्रवेश मिळावा, तसेच इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या बचावकार्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भारतीय सेना, महापालिका अग्निशमन विभाग, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि इतर संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून बचाव मोहिमेचा आढावा घेतला.
बचावकार्य अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना देत विविध यंत्रणांमध्ये समन्वय राखण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यावेळी भारतीय सैन्य दलाचे कर्नल आर. के. तिवारी, एनडीआरएफचे सेकंड कमांड दीपक तिवारी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
एनडीआरएफचे सेकंड कमांड दीपक तिवारी यांनी सांगितले की, इमारतीमध्ये सुरक्षितपणे प्रवेश करणे सध्या कठीण होत आहे. त्यामुळे प्रथम इमारतीभोवतीचा मलबा हटविण्याचे आणि धोकादायक ठरत असलेला अस्थिर भाग सुरक्षित करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर जवानांसाठी सुरक्षित मार्ग तयार करून आत अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.
सध्या तीन जेसीबी, पोकलेन आणि डंपरच्या सहाय्याने दुर्घटनास्थळी मलबा हटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. इमारत एका बाजूने झुकलेली असल्याने आणि बांधकामाचा काही भाग कोसळल्याने बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. मात्र, तांत्रिक बाबींचा विचार करून नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, “बचावकार्यातील प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आवश्यक ती सर्व यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. इमारतीचा अस्थिर भाग स्थिर केल्यानंतर जवानांना सुरक्षितपणे आत पाठवून अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याची कार्यवाही केली जाईल. एनडीआरएफ, भारतीय सेना, महापालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या समन्वयातून ही मोहीम सुरू असून अडकलेल्या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”


