मी तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत आरोपीने एकाच्या तोंडावर दगड मारला
जुन्या भांडणाच्या कारणावरून झोपेत असलेल्या एकाच्या तोंडावर दगड मारून त्याचा खून केला. ही घटना बुधवारी (दि. २) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संजय गांधी नगर झोपडपट्टी मोशी येथे घडली. इस्ताक ईनामुल खान (वय २६) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील बिजानबी ईनामुल खान (वय ५२) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल लोहार (रा. मोशी) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा इस्ताक ईनामुल खान व त्याचा मित्र विशाल कांबळे बुधवारी रात्री संजय गांधी झोपडपट्टीमध्ये भीमज्योत मंडळाच्या ओट्यावर झोपले होते. त्यावेळी त्याठिकाणी येत आरोपीने दारू पिऊन शिवीगाळ केली. तसेच तू माझे रक्त पिणार का, मी तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत इस्ताक याच्या तोंडावर दगड मारला. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या इस्ताकचा मृत्यू झाला.