पिंपरी-चिंचवड शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरातील विविध भागातील रस्त्यांवर तब्बल 2003 खड्डे आढळून आले होते. यापैकी महापालिकेने 1 हजार 580 खड्डे भरले असून सद्यस्थितीत फक्त 423 खड्डे बुजविण्याचे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
यंदा जूनच्या अखेर पावसाला ख-या अर्थाने सुरूवात झाली. शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत दोन हजार 3 खड्डे आढळले होते. यापैकी 1 हजार 639 खड्डे 13 जुलैपर्यंत आढळून आले होते. त्यानंतर 22 जुलैअखेर 364 खड्डे आढळून आले आहेत. यापैकी महापालिकेने डांबर आणि कोल्ड मिक्सने 1 हजार 11, बीबीएमने म्हणजे खडीने 356, पेव्हिंग ब्लॉकने 66, सिंमेंट कॉन्क्रीटने 147 असे 1 हजार 580 खड्डे पूर्णतः बुजविले असून शहरात फक्त 423 खड्डे बुजवायचे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडताच तत्काळ मुरूम, खडी आणि सिंमेंट कॉन्क्रीटने खड्डे बुजविले जातात. पावसाळा संपल्यानंतर सर्व खड्डे पुन्हा नव्याने डांबराने भरण्यात येणार आहे. यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील 1580 खड्डे भरले असून उर्वरित खड्डे बजुविले जात असल्याचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.
पिंपरीगावात पाण्यात डांबर टाकुन खड्डे बुजवण्याचा अजब प्रकार
पिंपरीगावात पाण्यात डांबर टाकुन खड्डे बुजवण्याचा अजब प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. खड्डा बुजवताना किमान खड्यातील पाणी काढण्याची तसदी सुद्धा ठेकेदारांकडून घेण्यात आली नसल्याची तक्रार स्थानिक नागरिक नंदू बलकवडे यांनी केली. पाण्यामुळे डांबर निघून गेल्यावर पुन्हा लगेचच खड्डा पडणार असे दिसते. त्यामुळे परिस्थिती ‘जैसे थे’ राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.