पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये वातावरणामध्ये जे बदल होतात ते बदलच या मानसिक अवस्थेला कारणीभूत होतात.
पावसाळ्यातील वातावरणामध्ये त्याहुनही पहिल्या पावसामध्ये मनाला एक वेगळीच हूरहूर लागते. जुन्या आठवणी दाटून येतात. बालपणातल्या, वाढत्या वयातल्या आणि तारुण्यातल्या सगळ्या गोष्टी मनात गर्दी करतात. मन अगदी हळवं होऊन जातं. गंमत म्हणजे तो अनुभव खूप हवाहवासा वाटतो. वाटतं, एकटंच कुठंतरी बसून राहावं, आपल्याच मनात डोकावून बघावं, शांत शांत व्हावं. हा अनुभव सहसा सर्वांनाच येतो, भावूक माणसांना अंमळ जास्तच. कितीही लोभस वाटले तरी हे क्षण मनाला उदास करतात. मन दुःखी होतं आणि हळूहळू निराशा मनावर दाटू लागते. ही निराशा तुमच्या नकळत, तुमच्या मनावर कब्जा करते आणि निराश मन हे कोणत्याही चुकीच्या दिशेला जाऊ शकतं. तुम्हाला वाटत असेल याचा ऋतुचर्येशी संबंध काय? तर याचा संबंध पावसाळी वातावरणाशी आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये वातावरणामध्ये जे बदल होतात ते बदलच या मानसिक अवस्थेला कारणीभूत होतात. तेव्हा उगाच स्वतःला भावूक वगैरे समजू नका. हा सगळा त्या पावसाच्या वातावरणाचा खेळ असतो, ज्याला तुम्ही बळी पडता. पहिल्या पावसाशी लहानपणीच्या व तारुण्यातल्या अनेक घटना-आठवणी जुळलेल्या असल्याने पहिल्या पावसामध्ये त्या आठवणी मनात दाटून येतात, हे त्या विशिष्ट वातावरणामुळेच घडते! दाटून आलेले ढग,काळोखे-कुंद वातावरण हे सगळे शरीरामध्ये एपिनेफ्रिन व कॉर्टीसॉल सारख्या स्ट्रेस हार्मोन्सचे स्रवण वाढवतात. एपिनेफ्रिन व कॉर्टीसॉल हे मूत्रपिंडावरील अधिवृक्क ग्रंथीकडून स्त्रवणारे हार्मोन्स (संप्रेरक) आहेत, ज्यांचा शरीरावरील बहुतांश महत्त्वाच्या अवयवांवर प्रभाव पडतो. हे संप्रेरक स्त्रवले जातात ते सभोवतालच्या संकटांना तोंड देण्यासाठी शरीराला सज्ज करण्यासाठी.
आता इथे प्रश्न पडेल की, पावसाळा सुरु झाल्यावर शरीराला कोणते संकट दिसते? तर सूर्यप्रकाश, ऊन लख्ख उजेड हा मानवप्राण्याच्या दृष्टिने सुरक्षित (आणि म्हणूनच आनंदीसुद्धा) असतो. मात्र पाऊस सुरु होताना दाटून येणारे ढग, वाढत जाणारा काळोख, सूर्यप्रकाशाचा व उजेडाचा अभाव, वादळी वारा व पाऊस ही सर्व परिस्थिती शरीराला सुरक्षित वाटत नाही. गेल्या हजारो वर्षांच्या पावसाळी दिवसांच्या आठवणी या मस्तिष्काला, आपल्या जनुकांना (जीन्सना) रम्य नाही तर त्रासदायक असल्याने शरीर त्या संकटाचा सामना करण्यासाठी स्ट्रेस हार्मोन्स स्त्रवून शरीराला सज्ज करु पाहते, ज्याची आजच्या २१व्या शतकात (अपवाद वगळता) तशी फारशी गरज नसते. पण त्याच्या परिणामी तुम्हीं मात्र उदास-निराश होत जाता.
थोडक्यात काय तर पाऊस पडून काळोखी वातावरण झाले की, शरीरामध्ये केमिकल-लोचा होतो आणि मन उदास होते, निराशा दाटून येते. तेव्हा तो लोचा घालवायचा असेल तर ती उदासी झटका. आहात त्या जागेवरुन हला, चाला, फ़िरा. जिवलगांना- मित्रांना भेटा. छानसा मेजवानीचा बेत आखा. एखादा खेळ खेळा, व्यायाम करा आणि दिवस अशाप्रकारे घालवा की पुढच्या पावसाळ्यामध्ये त्या आठवणी तुम्हाला आनंदी-उत्साही करतील आणि तुम्हाला तशीच धमाल करावीशी वाटेल. निराशा म्हणजे काय हो शेवटी, ‘निर + आशा’ मग त्यातला ‘निर’ काढला की राहिली आशा. हा जो ‘निर’ म्हणजे ‘नो’ आहे ना , त्याला आयुष्यात कधीही स्थान देऊ नका, मग निराशा तुमच्या जवळपाससुद्धा फ़िरकणार नाही!