Sunday, November 10, 2024
Homeगुन्हेगारीवाकडमधील सराईत गुन्हेगार शाहरुख खानच्या टोळीवर ‘मोक्का’

वाकडमधील सराईत गुन्हेगार शाहरुख खानच्या टोळीवर ‘मोक्का’

वाकड भागात दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार शाहरुख खान याच्यासह त्याच्या साथीदारांच्या विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. टोळीप्रमुख शाहरुख युनुस खान (वय २९), विकास उर्फ बाळा गोपाळ लोखंडे (वय २६), आनंद किशोर वाल्मिकी (वय २८), जुबेर युनुस खान (वय २२) आणि व्यंकटेश उर्फ विष्णु धर्मा कांबळे (वय २१, सर्व रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) अशी कारवाई करण्यात आलेल्या गुंडाची नावे आहेत.

शाहरुख खान आणि त्याच्या साथीदारांविरोधात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोडा घालणे, जबर दुखापत करुन चोरी, साधी दुखापत, खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न करणे, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड, घातक शस्त्रे बाळगणे असे १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. वाकड, सांगवी, हिंजवडी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत. ही टोळी वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करत होती.

या टोळीच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सांवत यांनी तयार केला होता. प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर शाहरुखच्या टोळीवर मोक्का कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. मागील चार महिन्यांत पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील नऊ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील १२६ आरोपींवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments