चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विनापरवाना लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे बॅनर, फलक, होर्डींग तात्काळ काढून टाकावेत, असे निर्देश अतिक्रमण निर्मूलन विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश आगळे यांनी बीट निरिक्षक आणि अतिक्रमण निरिक्षकांना दिले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करुन आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिले आहे. आचारसंहिता लागू असलेल्या कार्यक्षेत्रात विनापरवाना राजकीय बॅनर, फलक, होर्डींग्ज अथवा तत्सम जाहिराती असलेले फलक काढून टाकण्यासंबंधी महापालिकेच्या अतिक्रमण पथकामार्फत क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कारवाई सुरु आहे. ही कारवाई अधिक गतीमान करण्यासाठी आज राजेश आगळे यांच्या उपस्थितीत क्षेत्रीय कार्यालयातील सर्व बीट निरिक्षक, अतिक्रमण निरिक्षक यांची बैठक घेण्यात आली. थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीत पार पडलेल्या या बैठकीस विशेष अधिकारी तथा चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय कार्यालयांचे अतिक्रमण निरिक्षक व बीट निरिक्षक उपस्थित होते.
बैठकीत सर्व बीट निरिक्षक, अतिक्रमण निरिक्षकांना आपल्या अधिनस्त असलेल्या कार्यक्षेत्रात वारंवार पाहणी करावी, विनापरवाना राजकीय बॅनर, फलक, होर्डींग्ज अथवा तत्सम जाहिराती असलेले फलक काढून टाकण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या. दैनंदिन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे पाठविण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त आगळे यांनी संबंधितांना दिले.