कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार नसल्याने ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ अशा अवस्थेत असलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांना भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आदेश पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपचा झेंडा हाती घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, भाजप उमेदवाराला जाहीर पाठिंबा मनसेने दिला असला तरी मनसे पदाधिकारी प्रचारात सक्रिय सहभाग नोंदविणार नाहीत.
कसबा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे. तर चिंचवडमध्ये भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप उमेदवाराला पाठिंबा देणार की, तटस्थ राहणार याबाबत चर्चा सुरू झाली होती. त्यातच पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याबाबतचे स्पष्ट आदेश दिले नसल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती.