मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनिल देशमुख यांच्या गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अनिल देशमुख हा विषय महत्वाचा नसून मुकेश अंबानी यांच्या घराखाली पोलिसांनी स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवली. त्याची चौकशी होणार आहे का? अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली आहे.
ते म्हणाले की, “माझ्यासाठी अनिल देशमुख हा विषयच महत्वाचा नव्हता. महत्वाचा विषय होता की, मुकेश अंबानी यांच्या घराखाली पोलिसांनी स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवली. त्याची चौकशी होणार आहे का? राजीनामा दिला, चौकशी सुरु झाली की नंतर तुम्ही विसरुन गेलात. तुमच्या बातम्या बंद झाल्या की मग सगळेच विसरुन जाणार”.
“पण विषय तो नाही तर ती स्फोटकांनी भरलेली गाडी कोणाच्या सांगण्यावरुन ठेवली. मी त्यादिवशीही सांगितलं की, पोलीस कोणीतरी सांगितल्याशिवाय अशा प्रकारचं कृत्य करणार नाहीत. अनिल देशमुखांची चौकशी होईल, पण याचीही चौकशी झाली पाहिजे. पण आपण तिसरीकडेच चाललो आहोत. प्रत्येक वेळी विषय येतो तेव्हा त्याला फाटे फुटत जातात,” अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.
“माझ्या परिचयाची एक व्यक्ती आहे. त्यांना गाणं गाण्याची सवय आहे. गाणं गाताना ते तान देतात आणि ती इतकी जाते की नंतर ते मूळ गाणं विसरतात. मग ते कोणतं गाणं गायचं हे विसरायचे. तुमचं हे सगळं असं सुरु आहे. कशापासून सुरुवात झाली या गोष्टीची हे आपण पाहतच नाही,” असं राज ठाकरे म्हणाले.