महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पक्षप्रमुखांकडून नियोजित दौरे रद्द होणे, स्थानिक नेत्यांकडून आगामी महापालिका निवडणुका डोळय़ासमोर ठेवून नागरिकांच्या प्रश्नांमध्ये घेण्यात येणारी भूमिका आणि दुभंगलेल्या शिवसेनेमुळे निर्माण झालेल्या संधीचा लाभ घेण्याऐवजी समाजमाध्यमांवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास कार्यकर्त्यांना घातलेली बंदी, अशा परिस्थितीत पुण्यातील मनसे ही फुटीच्या उंबरठय़ावर आहे. ही फूट टाळण्यासाठी आणि पक्षाची पडझड रोखण्यासाठी मनसेची समन्वय समिती सक्रिय झाली आहे.
आगामी महापालिकेच्या निवडणुका हे लक्ष्य ठेवून प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ’बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाशी जवळीक करून बंडखोरीच्या पावित्र्यात असलेल्या मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनपरिवर्तन करण्याचे धनुष्य या समन्वय समितीने उचलले आहे. या समितीमध्ये पक्षाची ज्येष्ठ नेतेमंडळी असून ही समिती बंडखोरांचे बंड शमविण्यात यशस्वी होणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.
‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी अवस्था झालेल्या मनसेच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांची ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हा पर्याय जवळचा वाटत असल्याने संबंधित पदाधिकारी हे शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे अगोदरच कमकूवत असलेली मनसे आणखी खिळखिळी होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे राज्यभर दौरे करत असले, तरी पक्षाच्या धरसोड वृत्तीमुळे पुण्यातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात पडत आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीत राज ठाकरे हे कोणती ठोस भूमिका घेतात, याच्या प्रतीक्षेत संबंधित पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते असल्याची चर्चा आहे.