पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक सक्षम करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो विस्ताराला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील नागरिकांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे.
पिंपरी ते निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो विस्तारीकरणाच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने सोमवारी २३ ऑक्टोबर मान्यता दिली.
पहिल्या टप्प्यात पिंपरी ते दापोडी हा ७.९ किलोमीटरचा मार्ग १ ऑगस्ट २०२३ पासून सुरू झाला होता. तर, पिंपरी ते फुगेवाडी हा मार्ग ६ मार्च २०२२ पासून सुरू झाला आहे. या मार्गाच्या कामासोबत पिंपरी ते निगडी या ४.१३ किलोमीटर अंतराच्या मार्गाचे काम सुरू करावे, अशी शहरातील नागरिकांनी लावून धरली होती.
दरम्यान, राज्य सरकारने निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाला मान्यता दिली. केंद्र सरकारकडे दोन वर्षांपासून प्रस्ताव रखडला होता. केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाचे उपसचिव सुनील कुमार यांनी निगडीपर्यंत मेट्रोला मान्यता दिल्याचे पत्र राज्य सरकारला पाठविले आहे. त्यामुळे निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान पिंपरी ते निगडी या विस्तारित मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी अशी तीन स्थानके असतील. या विस्तारित मार्गासाठी होणाऱ्या खर्चात केंद्र सरकार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समप्रमाणात वाटा असेल.
हा प्रस्तावित कॉरिडॉर 4.13 किमी लांबीचा असून तो एलिव्हेटेड कॉरिडॉर म्हणून बांधला जाईल. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अंदाजे खर्च 910.18 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ३ वर्षात पुर्ण करण्याचे आश्वासन दिलेले आहें.